भरसभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 02:16 IST2015-05-22T02:16:38+5:302015-05-22T02:16:38+5:30
येथील पंचायत समितीत कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांनी मनमर्जी वाढली आहे. कर्मचारी कधीच वेळेवर कार्यालयात येत नाही.

भरसभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना डांबले
वर्धा पं.स. मध्ये कामयस्वरूपी अधिकाऱ्याची मागणी
वर्धा :येथील पंचायत समितीत कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांनी मनमर्जी वाढली आहे. कर्मचारी कधीच वेळेवर कार्यालयात येत नाही. यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा होतो. शिवाय समितीच्या क्षेत्रात येत असलेल्या गावात विकास कामांचा पुरता खोळंबा झाला आहे. यामुळे समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी द्या, अशी मागणी करीत पंचयात समिती सदस्यांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातला. यावर योग्य उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी सभेला उपस्थित अधिकाऱ्यांना पं.स. सभागृहात डांबले.
झालेल्या या प्रकारावर तोडगा काढण्याकरिता सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. ते हिंगणघाट येथे असल्याने त्यांच्याऐवजी बाल विकास प्रकल्पाचे सुनील मेसरे यांनी पंचायत समिती गाठत सदस्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सभागृहात बंद असलेल्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.
गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान बोरगाव (मेघे) सर्कलचे सदस्य संतोष सेलूकर, नालवाडी सर्कलचे बाळा माऊसकर, पुरुषोत्तम टोणपे व राजू उईके यांनी विविध विषयावरून प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना धारेवर धरले. या चार सदस्यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणत इतरही सदस्यांनी त्यांना समर्थन दिले. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सेलूकर यांनी गटविकास अधिकारी शिंदे यांच्या समक्ष सभेत बोरगाव (मेघे) सर्कलमधील विविध विकास कामे थंड बस्त्यात असल्याचा मुद्दा उचलला. सोबतच त्यांनी कार्यालयात अपूरे कर्मचारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत ते वेळीच कार्यालयात हजर राहत नसल्याचे सांगितले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. त्याच्या पाठोपाठ बाळा माऊसकर, पुरुषोत्तम टोणपे व राजू उईके यांनी त्यांच्या सर्कलमध्ये हिच परिस्थिती असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त पं.स. सदस्यांनी विविध प्रश्नांचा भडीमार करीत गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना भांबावून सोडले.
पंचायत समिती कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत, ती तात्काळ भरण्यात यावी. वर्धा पं.स. कार्यालयात बहुतांश कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहत नाही. तसेच अनेक कर्मचारी कामचुकारपणा करतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. पं.स. कार्यालयाचा कारभार अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असून येथे स्थायी गटविकास अधिकारी देण्यात यावा. आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्ते सदस्यांनी केल्या. (प्रतिनिधी)