ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक खर्च
By Admin | Updated: July 26, 2014 02:37 IST2014-07-26T02:37:30+5:302014-07-26T02:37:30+5:30
प्रत्येक आमदारांना वर्षाला कोटी दोन रुपये आमदार

ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक खर्च
ंंआमदारांचे रिपोर्ट कार्ड : सर्वाधिक कामे रणजित कांबळे यांच्या निधीतून
राजेश भोजेकर वर्धा
प्रत्येक आमदारांना वर्षाला कोटी दोन रुपये आमदार निधी म्हणून प्राप्त होतो. आपल्या मतदार संघातील महत्त्वपूर्ण कामे या निधीतून करावयाची असतात. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात आमदार निधीतून झालेल्या विकास कामांवर दृष्टी फिरविल्यास सर्वाधिक कामे ग्रामीण भागातील मतदारांवर डोळा ठेवून केली जात असल्याचे लक्षात येते. यामध्ये अप्रोच आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.
मागील तीन महिन्यात सुरू असलेल्या कामांचा धडाका बघता ना. रणजित कांबळे हे कामांच्या संख्येत तर आ. सुरेश देशमुख हे निधी खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहे. ना. कांबळे यांनी १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ६८ कामे हाती गेतली आहे, तर आ. देशमुख यांनी ५९ कामे हाती घेतली असून या कामांची किमत १ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपये इतकी आहे.
यापाठोपाठ आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचा क्रमांक लागतो. त्यांनी १ कोटी ८९ लाख ७६ हजार रुपये किंमतीची ६३ कामे सुरू केलेली आहे. शेवटचा क्रमांक हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. अशोक शिंदे यांचा लागतो. आ. शिंदे यांनी १ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये किमतीची ५२ कामे हाती घेतली आहे. यामध्ये सरासरी ७० टक्के पुल, नाल्या बांधकाम, सामाजिक सभागृह, समाज मंदिर, स्मशानभूमी अंतर्गत रस्ते बांधकामांचा समावेश आहे. २० टक्के विंधन विहिरींची कामे, तर १० टक्केमध्ये शाळांना संगणक, वाचनालयाला साहित्य पुरविणे या कामांचा समावेश आहे.
देवळी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक कामे रस्ते व पुल बांधकामाची सुरू आहे. या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी ना. कांबळे यांनी गावांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पुल, रपटे, अंतर्गत रस्त्यांची कामे त्यांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे.
वर्धा विधानसभा मतदार संघात आ. देशमुख यांनी हाती घेतलेली सुमारे ८५ टक्के कामे ही गावांतील हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची आहे. १० टक्के निधी उर्वरित कामांवर खर्च होत होत आहे.
आर्वी मतदार संघात सर्वाधिक निधी हा ग्रामीण भागातील रस्ते बांधकामावर खर्च करण्यात येत आहे. आ. केचे यांनी मागील तीन महिन्यात हाती घेतलेल्या कामांमध्ये गावांच्या अप्रोच रस्त्यांचा समावेश अधिक आहे. या पाठोपाठ समाज मंदिर, लहानसहान पुल व रपटे बांधकाम यासारखी कामे हाती घेतली आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघातही आ. शिंदे यांनी बांधकामावर विशेष भर दिला आहे. यामध्ये ७५ टक्के निधी हा रस्ते, लहानसहान पुल व इतर बांधकामावर खर्च केला जात आहे. १५ टक्के निधी हा शाळांना संगणक, सार्वजनिक सभागृह, समाज मंदिर सारख्या कामांवर खर्च करण्यात येत आहे. उर्वरित निधी इतर कामांवर खर्च केल्या जात आहे.
ग्रामपंचायतीही झाल्या आमदारांवर निर्भर
ग्रामपंचायतींकडे अपुरा निधी असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांचेही बांधकाम करता येणे शक्य नाही. ग्रामसभेच्या ठरावावर वरिष्ठ पातळीवर कार्यवाही होत नाही. ठरावामध्ये अनेक विकास कामे गावकऱ्यांकडून सुचविली जातात. मात्र ती केवळ कागदावरच राहतात. या ठरावामंध्ये वरिष्ठ पातळी खोडतोडीचे प्रमाणही वाढले आहे. एकीकडे ग्रामसभेला शासनाने अधिक महत्त्व दिले असतानाही प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळे विद्यमान ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना निष्क्रीयतेचा ठपका ठेवला जातो. हा ठपका पुसून काढण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचाच्या आमदारांकडे वाऱ्या सुरु होतात. आमदारही आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार फंडातून गावातील विकास कामांना महत्त्व दिले जात आहे. अलीकडे ग्रामपंचायती पूर्णत: आमदार निधीवर निर्भर झाल्याचे दिसून येते.