हल्ल्याच्या निषेधार्थ मातंग बांधवांचा मोर्चा
By Admin | Updated: December 28, 2015 02:36 IST2015-12-28T02:36:40+5:302015-12-28T02:36:40+5:30
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी गेलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर येथील पोलिसांनी लाठीहल्ला केला.

हल्ल्याच्या निषेधार्थ मातंग बांधवांचा मोर्चा
पीडितांना शासकीय मदतीची मागणी
हिंगणघाट : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी गेलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर येथील पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट येथील मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. तसेच कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.
हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्या घेवून १८ डिसेंबर रोजी मातंग समाजाचा मोर्चा निघाला होता. त्या मोर्चावर पोलिसांद्वारे लाठीहल्ला चढविला होता. यामध्ये अनेक जणांना गंभीर दुखापत झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट येथील मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात काढून निषेध नोंदविण्यात आला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानसभेवर निघालेल्या या मोर्चावर तेथील पोलीस प्रशासनाने कुठलीही सूचना न देता महिला, पुरूष, वृद्धांवर बेधुंद लाठीहल्ला करण्यात आला. यात अनेक महिला, पुरूष गंभीररित्या जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या बेधुंद लाठीमाराचा निषेध करीत समाजाला न्याय न दिल्यास आंदोलन केले जाईल असेही निवेदनात सांगण्यात आले.
शासनाने अ, ब, क, ड या प्रवर्गाप्रमाणे मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे, गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी, तसेच जखमींना शासकीय मदत मिळाली आदी मागण्याही उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.
मोर्चामध्ये माजी नगरसेवक गजानन मुंगले, राष्ट्रीय मातंग महासंघाचे तालुका अध्यक्ष केतन तायवाडे, आशा बावणे, मीरा गायकवाड, इंद्रजीत तायवाडे, प्रकाश निखाडे, संजय पोटफोडे, प्रभाकर खंदार, पुंडलिक तेलंग, दयाराम डोंगरे, बंडू डोंगरे, संदेश चव्हाण, दिलीप डोंगरे, संदेश ससाने, श्यामराव खडसे, अविनाश खंदार, दत्तू निखाडे, पांडूरंग डोंगरे, शीला चव्हाण, गुंफा पोटफोडे, साधना बावणे, कविता तायवाडे, संगीता मुंगले, सुमन बावणे, सुमन तेलंग, सत्यभामा पोटफोडे इतर आदी नागरिक निषेध मोर्चात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)