हुंड्यासाठी मोडले लग्न
By Admin | Updated: April 21, 2016 02:32 IST2016-04-21T02:32:17+5:302016-04-21T02:32:17+5:30
साक्षगंध झाल्यावर काही दिवसांनी लग्नाचे कपडे घेण्यासाठी वधूपिता मांडगावला गेले. यावेळी वराकडील मंडळींनी वधुपित्यास दोन लाख रुपये हुंडा मागितला.

हुंड्यासाठी मोडले लग्न
वधुपित्याची पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार
सेवाग्राम : साक्षगंध झाल्यावर काही दिवसांनी लग्नाचे कपडे घेण्यासाठी वधूपिता मांडगावला गेले. यावेळी वराकडील मंडळींनी वधुपित्यास दोन लाख रुपये हुंडा मागितला. यामुळे हे लग्न तुटले. संतापलेल्या वधुपित्याने दहेगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. पण ठाणेदार याकडे लक्ष देत नसल्याने वधूपित्याने विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार देऊन न्यायाची मागणी केली.
हमदापूर येथील रामचंद्र शेंडे यांच्या मुलीचे लग्न मांडगाव येथील संदीप रमेश चंदनखेडे यांच्याशी ठरले. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी हमदापूर येथे साक्षगंध झाले. काही दिवसांनी विवाहासाठी कपडे घेण्यासाठी म्हणून रामचंद्र शेंडे हे मांडगाव येथे चंदनखेडे यांच्याकडे केले. यावेळी वर पिता आणि इतरही मंडळींनी शेंडे यास दोन लाख रुपयांची मागणी केली. वधू पित्याने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हे लग्न मोडले. त्यामुळे संतापलेल्या रामचंद्र शेंडे यांनी दहेगाव पोलीस स्टेशन तेथे सात जणांविरूद्ध तक्रार नोंदविली. पण कारवाई करतो या सबबीखाली ठाणेदार बनसोड यांनी सतत चालढकल केली. ठाण्यातून तिघांना जामीनही मिळाला. बाकी चार जण मोकाटच आहे. त्यामुळे ठाणेदार या कारवाईस बगल देत असल्याचा आरोप करीत रामचंद्र शेंडे यांनी पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल करीत त्या सात जणांवर कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.(वार्ताहर)