खोट्या पावतीवर बाजारात वसुली

By Admin | Updated: October 3, 2016 00:41 IST2016-10-03T00:41:06+5:302016-10-03T00:41:06+5:30

दैनिक बाजाराचे कंत्राट असलेले नगर पालिकेचे कंत्राटदार शेख इस्माईल यांनी शनिवारी खोट्या पावत्या वापरून नियमबाह्यरीत्या वसुली करण्यात आली.

Market Recovery on false receipt | खोट्या पावतीवर बाजारात वसुली

खोट्या पावतीवर बाजारात वसुली

आम आदमी पार्टीचा आरोप : नगराध्यक्षांकडे कारवाईची मागणी
हिंगणघाट : दैनिक बाजाराचे कंत्राट असलेले नगर पालिकेचे कंत्राटदार शेख इस्माईल यांनी शनिवारी खोट्या पावत्या वापरून नियमबाह्यरीत्या वसुली करण्यात आली. झेंडूच्या फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ४० रुपयांची अवैध वसुली करण्यात आली. यामुळे शेख इस्माईल यांचे कंत्राट रद्द करावे. शेतकरी आणि नगर पालिका यांची खोट्या पावतीने वसुली करीत फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कलम ४२० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.
सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची अत्यंत वाईट स्थिती आहे. जिल्ह्यात दर दिवशी दोन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होत आहेत. शनिवारी चार शेतकऱ्यांनी आपली १० किलो झेंडूची फुले विक्रीला आणली होती. कृष्णा कातोरे, दादाराव कातोरे, अर्चना कातोरे आणि जयश्री कातोरे सर्व रा. धोत्रा हे कारंजा चौक येथे झेंडूची फुले विकायला बसल होते. दरम्यान, नगर पालिका दैनिक बाजार ठेकेदार शेख इस्माईल यांनी पालिकेचे प्रमाणित न केलेल्या बोगस बुकातून पावती देऊन प्रत्येकी ४० रुपये नियमबाह्यरित्या वसूल केले.
शेतकऱ्यांना आपला स्वत:चा माल विकण्याची परवानगी आहे. त्यावर कुठलाही कर लागत नाही. शिवाय केवळ १०० रुपये किमतीच्या झेंडूच्या फुलांवर ४० रुपये कर आकारणे निषेधार्ह आहे. त्यातच नगर पालिकेच्या दैनिक बाजार कंत्राटदाराने खोट्या पावती बुकातून ४० रुपयांच्या चार शेतकऱ्यांच्या पावत्या फाडून सुमारे १६० रुपये हस्तगत केले. यातून त्यांनी शेतकऱ्यांसह नगर पालिकेच्या नावावर वसुली करीत पालिकेची फसवणूक केली आहे.यामुळे नगर पालिका प्रशासनाने दैनिक बाजार ठेकेदार शेख इस्माईल यांचे दैनिक वसुली कंत्राट त्वरित रद्द करावे. त्यांनी शेतकरी आणि नगर पालिकेची फसवणूक केल्याने त्यांच्यावर फसवणुकीबाबत कलम ४२० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा. शेतकरी शेतातून जो माल विक्रीसाठी आणतात व मजूर पानाची पत्रावळी, फुले, द्रोण, विकतात, चिल्लर लहान दुकानदार यांच्याकडून कर वसूल करण्यात येऊ नये, अशी मागणीही आपने केली आहे. याबाबत नगराध्यक्षांना निवेदनही सादर करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Market Recovery on false receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.