बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू
By Admin | Updated: June 20, 2015 02:25 IST2015-06-20T02:25:26+5:302015-06-20T02:25:26+5:30
वर्धेसह पुलगाव, आर्वी सिंदी (रेल्वे) व आष्टी (शहीद) बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे.

बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू
राजकीय हालचालींना वेग : पुलगाव व आर्वीत ३६ जागांकरिता ७८ नामांकन दाखल
वर्धा : वर्धेसह पुलगाव, आर्वी सिंदी (रेल्वे) व आष्टी (शहीद) बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे. प्रत्येकी १८ जागा असलेल्या या निवडणुकीकरिता नामांकन अर्ज दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुलगाव व आर्वी बाजार समितीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची व ती परत घेण्याची प्रक्रिया झाली असल्याने येथे आजघडीला रिंंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली आहे.
वर्धा, आष्टी (शहीद) व सिंदी (रेल्वे) येथे नामांकन अर्ज विक्री सुरू आहे. यात वर्धेत आतापर्यंत १०७ नामांकन अर्ज दाखल झाले असून अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख २४ जून आहे. यानंतरच किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर आष्टी (शहीद) व सिंदी (रेल्वे) येथे नामांकन अर्ज विक्री सुरू आहे. सिंदी (रेल्वे) येथे आतापर्यंत केवळ चारच अर्जांची विक्री झाल्याची माहिती आहे. तर आष्टी (शहीद) येथे २२ अर्जाची विक्री झाली आहे. यापैकी एकही अर्ज भरून परत आला नाही. या दोनही बाजार समितीत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून असल्याने येथील रिंगणात असलेल्या उमेदवाराची स्थिती अद्याप स्पष्ट झाली नाही.
निवडणूक असलेल्या पाचही बाजार समितीत प्रत्येकी १८ सदस्यांकरिता निवडणूक होणार आहे. या सर्वच बाजार समितीत ११ जागा सेवा सहकारी संस्थांना आहे, चार जागा ग्राम पंचायत, दोन जागा व्यापारी अडते, एक जागा हमाल मापारी व एक जागा पणन प्रक्रिया संस्थेकरिता आहे. पाचही समितीची निवडणूक येत्या जुलै महिन्यात होणार आहे. यामुळे समितीत आपली सत्ता कायम रहावी याकरिता सत्ताधारी धडपडत आहे, तर विरोधी गटही सक्रिय झाले असून सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. कुठे विरोधी पक्षात युती तर कुठे सदस्यांची पळवापळव सुरू असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या आष्टी बाजार समितीतून २२ अर्जाची विक्री झाली आहे. पैकी किती अर्ज येतील यानंतरच रिंगणातील उमेदवारांची संख्या कळणार आहे. येथे भाजप व राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचे सकेत मिळत आहे. यामुळे येथे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे चित्र आहे. वर्धा बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात राहिली आहे. यात सभापती पद माजी आमदार सुरेश देशमुख गटाकडे राहिले आहे. यंदा मात्र येथे भाजप सत्तेचा सारीपाट मांडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आहे. उमेदवारी अर्ज दाखल ते परत घेण्याच्या तारखेनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.(प्रतिनिधी)
वर्धा बाजार समितीत १०७ नमांकन
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता विविध गटातून एकूण १०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. समितीत एकूण ११९ नामांकन आले होते. छानणीत १२ नामांकन रद्द करण्यात आले होते. यात सहकार संस्थेकडून ११ जागांकरिता ५८ अर्ज आले आहेत. तर ग्रामपंचायत गटाच्या चार जागांकरिता २८ नामांकन आले आहे. शिवाय व्यापारी अडते गटाच्या दोन जागांकरिता सात अर्ज आले आहे. हमाल मापारी व पणन प्रक्रिया या गटाकरिता असलेल्या एका जागेकरिता १५ नामांकन दाखल झाले.
सतत राकाँच्या देशमुख गटाच्या ताब्यात असलेल्या या समितीत १ हजार ५६९ मतदार आहेत. यात व्यापारी अडते गटाकरिता ३५७, ग्रामपंचायत टाकत ६९८ तर सहकार गटात एकूण ४५५ मतदार आहेत.
आष्टीत भाजप-राकॉ युतीचे संकेत
सतत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर आपली सत्ता स्थापन करता यावी याकरिता भाजप व राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. येथे तसेही भाजप आणि राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चित्र आहे.
सिंदी (रेल्वे) बाजार समितीत नामांकन अर्ज विक्री सुरू झाली आहे. येथे सध्या निवडणुकीचे गणित जुळविणे सुरू असल्याने अर्ज विक्रीला जोर आला नाही.