पर्यटकांना खुणावतोय बोर व्याघ्र प्रकल्प
By Admin | Updated: October 18, 2014 01:49 IST2014-10-18T01:49:29+5:302014-10-18T01:49:29+5:30
समृद्ध निसर्ग, विपुल प्रमाणात वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला मध्यभारतातील समृद्ध अशा बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी वन पर्यटनाची अपूर्व मेजवानी ठरत आहे.

पर्यटकांना खुणावतोय बोर व्याघ्र प्रकल्प
वर्धा : समृद्ध निसर्ग, विपुल प्रमाणात वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला मध्यभारतातील समृद्ध अशा बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी वन पर्यटनाची अपूर्व मेजवानी ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू झाला असून, संपूर्ण भारतातील पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी भेट देत आहेत.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कार्यालयात जंगल सफारीसाठी बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना दररोज सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ६ पर्यंत जंगल पर्यटनांचा आनंद घेणे सुलभ झाले आहे. स्थानिक बेरोजगार युवकांनी नागरिकांच्या सफारीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खुल्या जिप्सीचीही व्यवस्था केली आहे. तसेच पर्यटन करताना व्याघ्र प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी गाईडची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प बोर नदीच्या १४० चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण परिसरात असून याच नदीवर बोर सिंचन प्रकल्पसुद्धा असल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याचीसुद्धा नैसर्गिकपणे उपलब्धता आहे. वाघासह बिबट, सांभर, चितळ, नीलगाय, चौसिंगा, भेकळ, अस्वल, रानमांजर, रानकुत्रे आदी प्राण्यांसह विविध प्रजातीचे पक्षी तसेच विदेशी पक्षी, विविध प्रजातीचे वृक्ष, वनस्पती आदी विपुल प्रमाणात असल्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प मुख्य आकर्षण ठरत आहे. याच कारणाने येथे पर्यटनासाठी येत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.(शहर प्रतिनिधी)