मार्चमध्येच जिल्ह्याला ‘मे हिट’चा तडाखा
By Admin | Updated: March 30, 2017 00:29 IST2017-03-30T00:29:58+5:302017-03-30T00:29:58+5:30
उन्हाळ्यामध्ये साधारणपणे मे महिन्यात सर्वाधिक उष्णतामान असते; पण यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच पारा ४३.८ अंशांवर

मार्चमध्येच जिल्ह्याला ‘मे हिट’चा तडाखा
पारा @ ४३.८ : ४५ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज
वर्धा : उन्हाळ्यामध्ये साधारणपणे मे महिन्यात सर्वाधिक उष्णतामान असते; पण यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच पारा ४३.८ अंशांवर पोहोचल्याने जिल्ह्याला मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा सोसावा लागतोय. हा पारा ४५ अंशांपर्यंत वाढेल, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला. मध्यप्रदेशातील ‘वॉर्म स्पेल’चा हा प्रभाव असल्याचेही सांगण्यात आले आहे.
विदर्भातील उष्णतामानात किमान २ एप्रिलपर्यंत सातत्याने वाढ होणार आहे. यात पारा ४४ ते ४५ अंशांपर्यंत वाढेल, असे संकेत आहेत. मध्यप्रदेश येथे सध्या ‘वॉर्म स्पेल’ सुरू आहे. परिणामी, उष्णतामानात वाढ होत आहे. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने तापमान वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. शिवाय मध्यप्रदेशातून वाहणारे उष्ण वारे विदर्भावर परिणाम करीत आहेत. यामुळे येथील तापमानात वाढ झाली आहे. वॉर्म स्पेलमुळे कमाल आणि किमान तापमानातही सतत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील वॉर्म स्पेल विदर्भातील तापमान वाढवित असल्याने जिल्ह्यात उन्हाळा जड जाणार असल्याचेच दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)
एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणाची शक्यता
कर्नाटक प्रदेशात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे; पण त्यामुळे पावसाच्या सरी होण्याची शक्यता नसून केवळ ढगाळ वातावरण राहील. यामुळेही उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. यंदा अवकाळी पाऊस न झाल्याने विदर्भ प्रदेश कोरडा झाला असून अधिक उष्णतामान जाणवत आहे.
वॉर्म नाईटचाही प्रभाव
सतत वाढणाऱ्या उष्णतामानाला वॉर्म नाईटही कारणीभूत आहे. वॉर्म नाईटच्या स्थितीत किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशाने वाढत असते. ही स्थिती सध्या विदर्भातील बुलडाणा व अकोला जिल्ह्यात आहे. हा घटकही उष्णतावाढीस कारणीभूत आहे.
सध्या विदर्भात तापमान वाढीस पोषक वातावरण आहे. यामुळे प्रत्येक दिवशी ०.४ ते ०.५ अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती २ एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही सर्वसाधारण भौगोलिक घटना असून याला अन्य कुठलेही घटक कारणीभूत नाहीत.
- अविनाश ताठे, संचालक, वेधशाळा, नागपूर.