कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये होतेय चालढकल; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांची चाचणी करण्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:14+5:30

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय-रिक्स आणि लो-रिक्समधील व्यक्तीची माहिती गोळा करून वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जायचे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जायची. आता गेल्या दोन महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. याला काही प्रमाणात रुग्ण आणि नागरिकही जबाबदार आहेत. घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून चाचणी करून घेणे, हे कर्तव्य आहे.

Manipulation in contact tracing; Neglected to test five people in positive contact | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये होतेय चालढकल; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांची चाचणी करण्याकडे दुर्लक्षच

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये होतेय चालढकल; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांची चाचणी करण्याकडे दुर्लक्षच

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेवरील वाढतोय ताण : रुग्णांकडून असहकार्य; लपविली जात आहेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाकडून सुरुवातीपासून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात केले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये चालढकल केली जात असल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय-रिक्स आणि लो-रिक्समधील व्यक्तीची माहिती गोळा करून वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जायचे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जायची. आता गेल्या दोन महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. याला काही प्रमाणात रुग्ण आणि नागरिकही जबाबदार आहेत. घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून चाचणी करून घेणे, हे कर्तव्य आहे. परंतु संपर्कातील व्यक्तीही चाचणी न करता बिनधास्त फिरत राहतो. कोरोनाबाधित रुग्णही संपर्कातील व्यक्तींची माहिती देण्यास टाळाटाळ करतो. घरातील मंडळीसुद्धा चाचणी करण्यास पुढाकार घेत नसल्याचा अनुभव आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा नागरिकांनीही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ओळखून काळजी घेणे गरजेचे आहे.

चाचणी वाढली की, पॉझिटिव्ह रुग्णही वाढतात

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८५ हजार ७५५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठविले असून, एक लाख ८५ हजार ७३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ६५ हजार ४१९ अहवाल निगेटिव्ह आले असून, १८ हजार ९८२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. 
आतापर्यंत १६ हजार ८७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या एक हजार ६६३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोरोना चाचणी वाढविली की रुग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. 
३० मार्च रोजी जिल्ह्यात १०७ चाचण्या केल्या असता २२ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या, तर ३१ मार्चला एक हजार ६७९ चाचण्यांमध्ये ३३६, तर आज १ एप्रिलला दोन हजार २२ चाचण्या केल्या असता २८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 

हा घ्या पुरावा... 
वर्धा शहरातील सिंदी (मेघे) परिसरातील एका युवकाला त्रास व्हायला लागल्याने त्याने सुरुवातील अ‍ॅन्टिजेन चाचणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या तो युवक गृहविलगीकरणात असून, दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोन आला व त्यांनी परिवारातील सदस्यांची माहिती घेतली. परंतु, ना परिवारातील सदस्यांची कोरोना चाचणी केली ना आजूबाजूच्या व्यक्तींची किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील माहिती घेतली गेली.
वर्ध्यातील शास्त्रीनगर परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचाराकरिता सावंगीला दाखल करण्यात आले. वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर परिवारातील सर्वच सदस्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी केली असता मुलगाही पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरावर स्टिकर चिपकविले; परंतु या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली नाही. आता वडील आणि मुलगा हे दोघेही कोराेनामुक्त झाले आहे.

 

Web Title: Manipulation in contact tracing; Neglected to test five people in positive contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.