ममदापूर उद्ध्वस्त

By Admin | Updated: March 13, 2015 02:07 IST2015-03-13T02:07:18+5:302015-03-13T02:07:18+5:30

जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे.

Mamedpur destroyed | ममदापूर उद्ध्वस्त

ममदापूर उद्ध्वस्त

वर्धा : जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे. या पावसासोबत वारा व गारपीट होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वर्धा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. पावसासोबत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अख्खे ममदापूर गावच उद्ध्वस्त झाल्यागत परिस्थिती आहे. या गावातील ७० टक्के घरांवरील छत या वाऱ्यामुळे उडून गेले. यामुळे नागरिक उघड्यावर आले आहेत.
सोमवारी रात्री देवळी व कारंजा (घाडगे) या तालुक्यात पावसाने कहर माजविला. बुधवारी रात्री आलेल्या वादळी पावसाचा फटका वायगाव (नि.), कानगाव, गिरोली, पाथरी, टाकळी (चना), ममदापूर, सरूळ, भिवापूर, सेलू (काटे), कुरझडी, आजगाव, वडद, नेरी या गावांना बसला. देवांगण येथील खान यांच्या शेतातील संत्रा पुर्णत: उद्ध्वस्त झाला. ममदापूर येथे वारा आला की चक्रीवादळ हेच कळायला मार्ग नाही. येथे बऱ्याच घरांवरीरल छत उडाले. शासनाने पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कारंजा (घाडगे) येथील मधुकर बाजारे यांच्या घरावर वीज कोसळली. याम कुठलीही प्राणहानी झाली नाही. (प्रतिनिधी)

सेवाग्राम रेल्वे स्थानकावर वीज कोसळली
या वादळी पावसासह विजांचा गडगडात सुरूच होता. यात रात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका झाडावर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळली. ही वीज एका झाडावर कोसळली. यात उभे झाड खालपासून वरपर्यंत अक्षरश: सोलल्या गेले.
संत्रा बाग उद्ध्वस्त
वायगाव (निपाणी) परिसरात असलेल्या देवांगण शिवारात असलेल्या संत्र्याच्या बगिच्याला या वादळाचा चांगलाच फटका बसला. यात बागेतील संत्रा जमिनीवर पडलाच तर उभी झाडेही वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळली.
पोल्ट्री फार्मचे नुकसान
वायगाव येथील प्रफुल्ल मोते यांच्या पोल्ट्री फार्मचेही यात नुकसान झाले. या वादळात त्यांच्या ५५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.
घरांवरील टिनपत्रे उडाल्याने संसार उघड्यावर
ममदापूर गावाला बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. आलेल्या वादळात पाऊस व गारपीट झाल्याने त्याचा फटका शेतांना बसला. आलेला वारा होता की चक्रीवादळ हे समजण्यापूर्वीच गावातील ललीता केराम, कवडू गिरडे, बबन सयाम, पुरुषोत्तम दुधकोर, संजय धुर्वे, नितिन कोरेकर, विठ्ठल पुसदकर, भाऊराव केराम, मनोहर नेजेकर, सुरेश इखार, जयवंता पेंदाम, सुधाकर मरस्कोल्हे, शंकर नेहारे, नानाजी केराम, प्रभाकर देशमुख यांच्या घरावरील छत उडून गेले.
गारपीटीमुळे गहू, चना, पालेभाज्या आदी पिकांचे नुकसान झाले. यात गावातील उमेश ठाकूर, प्रविण काटोले, माणिक लांबट, साहेबराव चावरे, गंगाधर घोडखांदे, प्रशांत निवल, मंगेश चौधरी, रंगरावर तळवेकर, सुभाष तळवेकर यांचे नुकसान झाले.
नुकसान झालेल्या या भागाची पाहणी करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Mamedpur destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.