महसूल प्रशासन अधिक गतिमान करा!
By Admin | Updated: August 3, 2016 01:01 IST2016-08-03T01:01:10+5:302016-08-03T01:01:10+5:30
महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या समन्वयाची जबाबदारी...

महसूल प्रशासन अधिक गतिमान करा!
अनुप कुमार : उत्कृष्ट अधिकारी म्हणून वैभव नावडकर मनोहर चव्हाण व एस.व्ही. हाडके यांचा सत्कार
वर्धा : महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या समन्वयाची जबाबदारी या विभागाकडे सोपविण्यात आली आहे. महसूल प्रशासन अधिक गतिमान करून जनतेला जलद सुविधा उपलब्ध करून द्या, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले.
महसूल दिनानिमित्त नागपूर विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रूपा कुळकर्णी, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अपर विभागीय आयुक्त संजीव उन्हाळे, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी उपस्थित होते. वर्धा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना वैभव नावडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यासाठी शाळेत विशेष शिबिरांचे आयोजन करून वेळेत दाखले मिळवून दिले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी व घरांच्या नुकसानीबाबत मदतीचे वाटप करताना सुसूत्रता आणने, महसूल वसुलीबाबत श्रम घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे, न्यायालयीन व दंडाधिकारी कामे विहित कार्यपद्धतीने हाताळताना जनतेची कामे करण्यासाठी विशेष श्रम घेतल्याबद्दल उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून अनुप कुमार यांनी प्रशस्तीपत्र देवून गौरव केला.
आर्वी येथील तहसीलदार मनोहर चव्हाण यांना तहसीलदार संवर्गात २०१५-१६ या वर्षात संपूर्ण विभागात स्वयंस्पूर्तीने पुढाकार घेत महसूल सेवांचा लाभ जनतेला दिल्याबद्दल तसेच महसूली वसुलीसाठी केलेल्या परिश्रमाबद्दल विभागीय आयुक्तांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर, टंचाई व नैसर्गिक आपत्ती काळातील कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील एस.व्ही. हाडके यांना लघुलेखक संवर्गात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले आहे. तलाठी संवर्गात देवळी तहसील कार्यालयाने एस.एम. पवार, शिपाई संवर्गात जिल्हाधिकारी कार्यालयाचे सलीम शेख, वसंता पिसे, या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांनी महसूल प्रशासनात कार्यरत असताना केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी महसूल उपायुक्त पापळकर यांनी प्रास्ताविकातून महसूल दिन व महिलांच्या सबळीकरणासाठी महिनाभर राबविण्याच्या उपक्रमांची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)