विद्यार्थिनींना परिवहनच्या पासेस उपलब्ध करून द्या
By Admin | Updated: July 27, 2014 00:15 IST2014-07-27T00:15:51+5:302014-07-27T00:15:51+5:30
देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील शाळा सुरू होऊन महिना होत आला आहे़ तरीही शाळेत काही अंतरावरून ये-जा करीत असलेल्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सध्या बसच्या पास मिळाल्या नाहीत़

विद्यार्थिनींना परिवहनच्या पासेस उपलब्ध करून द्या
वर्धा : देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील शाळा सुरू होऊन महिना होत आला आहे़ तरीही शाळेत काही अंतरावरून ये-जा करीत असलेल्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सध्या बसच्या पास मिळाल्या नाहीत़ यामुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे़ त्यांना लगेच बसेसच्या पास उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदनाद्वारे केली आहे़ शिवाय पास देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली़
निवेदनानुसार कोळोणा (चोरे) येथील विद्यार्थिनी देवळी येथील जनता हायस्कूल, यशवंत हायस्कूल येथे आठवी व नववीमध्ये शिकत आहे़ शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला़ तरीही सदर विद्यार्थिनींना एस़ टी़ बसच्या पास मिळालेल्या नाही़ मुलींच्या शिक्षणासाठी राज्य शासनाने ही सुविधा सुरू केली आहे़ परंतु औदासिन्यतेमुळे विद्यार्थिनींना पासपासून वंचित राहावे लागत आहे़ आपल्या मुलींना पास सुविधा मिळावी या करिता पालकांनी पुलगाव आगार गाठून येथील आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर पास उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता व्यवस्थापकांनी पास देण्यास नकार दिल्याचा आरोप निवेदनात केला आहे़ तसेच शाळा व्यवस्थापनानेही पास काढण्यासाठी प्रयत्न केले़ परंतु त्यांनाही यश आले नाही़ आजुबाजूच्या काही गावातील विद्यार्थ्यांना आगाराने पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ परंतु कोळोणा (चोरे) येथील विद्यार्थिनींना पास उपलब्ध करून न दिल्यामुळे हा दुजाभाव का असा प्रश्न या पालकांना पडला आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत आगाराला सूचना देत पासची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे़ यावेळी शिष्टमंडळात संतोष नगराळे, बबन ओंकार, गौतम थुल, मारोती तेलंगे, भारत मडावी, सुरेश नगराळे, सुनील मानकर, उपासे, भुजाडे, आदींचा समावेश होता़(शहर प्रतिनिधी)