बहुमत भाजपला, पण सरपंच राष्ट्रवादीचा वेळ गेल्यानंतर परिवर्तन आघाडी अवतरली
By Admin | Updated: December 11, 2015 02:34 IST2015-12-11T02:34:44+5:302015-12-11T02:34:44+5:30
लगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यात भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे दहा सदस्य संख्या ....

बहुमत भाजपला, पण सरपंच राष्ट्रवादीचा वेळ गेल्यानंतर परिवर्तन आघाडी अवतरली
बहुमत भाजपला, पण सरपंच राष्ट्रवादीचा
वेळ गेल्यानंतर परिवर्तन आघाडी अवतरली
वर्धा : लगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यात भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे दहा सदस्य संख्या असताना सरपंच पद मात्र राष्ट्रीवादी काँगे्रसने बळकाविल्याने संदीप पाटील सरपंचपदी विराजमान झाले. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ असताना भाजपकडून एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. सरपंचपदाकरिता एकच अर्ज आला असल्याने ही निवडणूक अविरोधच पार पडली.
१७ सदस्य संख्या असलेल्या म्हसाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादी काँगे्रसला ६, अपक्ष १, मनसेला ३, कॉँग्रेसला ३ तर भाजपला चार जागेवर यश मिळविता आले. यात भाजप, काँगेस आणि मनसे असे परिवर्तन पॅनल होते. या पॅनलचे एकूण दहा सदस्य निवडून आल्याने सरपंच भाजपाच होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती.
तहसीलदार राहुल सारंग यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.९) सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करावयाचे होते. राष्ट्रवादी काँगे्रसकडून संदीप पाटील यांनी अर्ज सादर केला तर परिवर्तन पॅनल, भाजप वा मनसेकडून एकाही सदस्याचा अर्ज आला नाही. यामुळे सरपंचपदी संदीप पाटील यांची अविरोध निवड झाली. उपसरपंच पदाकरिता अनिल उमाटे व धीरज वर्मा यांनी अर्ज सादर केले. यात वर्मा यांनी अर्ज मागे घेतल्याने उमाटे यांची निवडही बिनविरोध करण्यात आली.
दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावयाचे होते. छाणणी झाल्यानंतर २ वाजता उमेदवारांची यादी घोषित होणार होता; पण अर्ज न आल्याने निवडणूक अविरोध झाली. यानंतर २.१० वाजता काहींनी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला; पण यावर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदविल्याने अविरोध निवडणूक कायम राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वासुदेव डेहणे, सहायक अधिकारी म्हणून तलाठी एस.सी. मानकर, सचिव एम.सी गोल्हर यांनी काम पाहिले. म्हसाळा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसने आघाडी करीत सरपंच, उपसरपंच पद काबीज केले. भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे बहुमत असतानाही जाणिवपूर्वक सत्ता प्रस्थापित केली नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.(कार्यालय प्रतिनिधी)