Maharashtra Gram Panchayat Election Results; वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:31 IST2021-01-18T16:30:43+5:302021-01-18T16:31:03+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, कवठा रेल्वे व आकोली या तीन ग्रा.पं.च्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले.

Maharashtra Gram Panchayat Election Results; वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, कवठा रेल्वे व आकोली या तीन ग्रा.पं.च्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. यापैकी बोरगाव आलोडा व कवठा (रेल्वे) या दोन ग्रा.पं.काँग्रेस व राष्ट्रवादीला तसेच आकोलीची ग्रा.पं. भाजपाच्या वाट्याला आली. या तीनही ग्रा.पं.च्या मतदारांनी मागील सत्ता नाकारून नव्यांना संधी दिली. विशेष म्हणजे आकोली ग्रा.पं. मध्ये सेनेचा कोणताही उमेदवार रिंगणात नसताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची या ठिकाणी प्रचार वारी झाली. आयोजित भाषणात त्यांनी भाजपावर टीका करून सेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. परंतु येथे सेनेचे उमेदवार रिंगणात नसल्याचे काहींनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कपाळावरच हात मारून घेतल्याची चर्चा होत आहे.
गावात मंत्र्याची सभा होऊनसुद्धा भाजप सत्तेत आल्याची टीका होत आहे. बोरगाव आलोडा ग्रा.पं. मध्ये राष्ट्रवादीच्या प्रशांत निमसडकर गटाने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळविला. दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. या ग्रा.पं. मध्ये गणेश मानकर, सविता राजू कापटे, सारिका गजानन भोयर, अमित दोड, माधुरी नीतेश डोंगरे, पूजा रवींद्र खेवले, अमोल निमसडकर, प्रतीक सोयाम व शालिनी प्रशांत निमसडकर हे उमेदवार विजयी झाले. कवठा रेल्वेच्या ९ सदस्यीय ग्रा.पं. मध्ये काँग्रेसच्या जय महल्ले गटाने ५ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले. भाजपा व इतर पक्षांच्या उमेदवारांना चार जागा मिळाल्या. या ग्रा.पं. मध्ये अक्षय गणवीर, शुभांगी अनिल कांबळे, कामिनी बापू काळे, अंकुश मडावी, सुवर्णा विनोद मून, सुवर्णा अशोक राऊत, संदीप डोंगरे, सौरभ डहाके आणि दीपमाला संतोष नेहारे हे उमेदवार विजयी झाले. आकोली-दुरगडाच्या सात सदस्यीय गट ग्रा.पं. मध्ये भाजपाच्या राजेश बकाने गटाने पाच जागा जिंकून बहुमत मिळविले. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. या ग्रा.पं. मध्ये रवी बोडे, संजय बोडे, अर्चना गजानन बकाले, संगीता विलास ताजने, उमेश मून व साधना नरेश पाटील आदी उमेदवार विजयी झाले.