शासनाने अनुदान न दिल्याने महाबीजचे सोयाबीन महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:32+5:30
कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे.

शासनाने अनुदान न दिल्याने महाबीजचे सोयाबीन महागले
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) (वर्धा) : यावर्षी कापसाला मिळणारा अत्यल्प भाव आणि विक्रीकरिता होत असलेला त्रास पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या महाबीजने अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत सोयाबीन बियाण्याच्या दरात दीडपट वाढ केली आहे. याचाच फायदा घेत खासगी कंपनीनेही दर वाढविल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत प्रमाणिकरण व विश्वासार्हता असलेल्या महाबीजनेही सोयाबीन बियाण्यांच्या दरात भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. मागीलवर्षी महाबीज सोयाबीनच्या ९३०५ या वाणाच्या बियाण्याची ३० किलोची बॅग १ हजार ४५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये ८९० रुपयांनी वाढ केली असून २ हजार ३४० रुपयांत घ्यावी लागत आहे. तर ९५६० या वाणाच्या बियाण्याची ४० किलोची बॅग मागीलवर्षी १ हजार ८५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये तब्बल १ हजार ४३० रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना ३ हजार २८० रुपयांत खरेदी करावी लागत आहे. महाबीजच्या बियाण्यांची किंमत वाढल्याचा फायदा घेत इतर खासगी कंपनीनेही बियाण्याचे दर वाढविल्याने यावर्षी सोयाबीन उत्पादकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकºयांचे कृषिमंत्र्यांना निवेदन
वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील शेतकरी अमरावती, नागपूर, यवतमाळ येथून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे आता तालुक्यातूनच बियाणे खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढणार आहे. बियाण्यांची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविला आहे. यावर्षी आष्टी तालुक्यात १२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज असून शेतकरी कितीही भाववाढ झाली तरी पर्याय नसल्याने बियाणे खरेदी करणार आहे. त्यामुळे शासनाने महाबीजला तत्काळ अुनदान दिले तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. त्यामुळे तत्काळ अनुुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी डॉ. नरेंद्र देशमुख, रवींद्र जाणे यांनी कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाकडून महाबीजला अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. म्हणून पूर्ण दराने सोयाबीनचे बियाणे विकणे सुरू आहे. यावर्षी ३० किलोच्या बॅगवर ६ रुपये तर ४० किलोच्या बॅगवर १० रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. शासनाने अनुदान दिले नसल्यामुळेच हा प्रश्न बिकट झाला आहे.
- अजय फुलझेले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.