मदन उन्नईचे विश्रामगृह रखडले

By Admin | Updated: May 18, 2016 02:17 IST2016-05-18T02:17:59+5:302016-05-18T02:17:59+5:30

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे.

Madan unveiled the rest house of Unnai | मदन उन्नईचे विश्रामगृह रखडले

मदन उन्नईचे विश्रामगृह रखडले

अधिकारी अनभिज्ञ : अनाठायी खर्च करून सोडले कंत्राटदाराने काम
आकोली : पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. अधिकारीच नसल्याने सात-आठ वर्षांपासून बांधकामाचा तिढा सुटलेला नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
मदन उन्नई प्रकल्पाला भेट देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासाठी येथे थांबण्याची सोय नव्हती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या संकल्पनेतून विश्रामगृहाच्या निर्मितीला मूर्त स्वरूप आले. बांधकामाकरिता निधीही मंजूर करण्यात आला. नियोजित जागेचे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन करण्यात आले. बांधकामालाही सुरूवात झाली होती; पण बांधकामाचे फाऊंडेशन (जोता) पूर्ण झाल्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. बांधकामासाठी पाणी गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन विहिरीचे खोदकाम व बांधकाम नियोजित विश्रामगृहाच्या बाजूला करण्यात आले. या माध्यमातून सदर कामासाठी लाखो रुपयांचा आगाऊ खर्च करण्यात आला. असे असले तरी अद्यापही बांधकामाने गति घेतली नाही.
संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराला काम देणे क्रमप्राप्त होते; पण याबाबत अधिकाऱ्यांनी रूची दाखवली नाही. यामुळे आठ वर्षांपासून बांधकाम जैसे थे आहे. खोदकाम व बांधकाम यात आलेला खर्च तसेच विश्रामगृहाच्या बांधकामावर आतापर्यंत झालेला खर्च अनाठायी झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेल्या खर्चाची वसुली होणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)

धरण होणार प्रकाशमान
मदन उन्नई धरण परिसरात होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत ‘लोकमत’ ने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. धरण परिसरात फेरफटका मारला असता धरणाच्या भिंतीवर साडे तीन फूट खोल व दोन ते अडीच फुट रुंद लांबच-लांब चर खोदल्याचे आढळून आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता पर्यटकांच्या दृष्टीने तसेच अवैध प्रकार टाळता यावे म्हणून पथदिवे बसविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. धरण परिसरात अवैध उत्खनन करून मुरूम चोरी होत होती. यासाठीच तर चर खोदण्यात आली नाही ना, अशी शंका उपस्थित होत होती; पण पथदिवे लागणार असल्याने परिसरात चालणाऱ्या अवैध प्रकारांवर चाप बसणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

Web Title: Madan unveiled the rest house of Unnai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.