निम्न वर्धा प्रकल्पाची वाट खडतर
By Admin | Updated: August 1, 2016 00:36 IST2016-08-01T00:35:21+5:302016-08-01T00:36:05+5:30
गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; ....

निम्न वर्धा प्रकल्पाची वाट खडतर
रस्त्यावर केवळ चिखल आणि डबके : सार्वजनिक बांधकामसह प्रकल्प विभागाचाही कानाडोळा
वर्धा : गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; पण पर्यटन स्थळांचा विकास झपाट्याने होताना दिसतच नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही पर्यटनस्थळापेक्षा कमी नाहीत. असे असताना त्या प्रकल्पांकडे जाणाऱ्या मार्गांची अत्यंत दयनिय अवस्था असल्याचे निम्न वर्धा प्रकल्पाला दिलेल्या भेटीत दिसून आले. निम्न वर्धा प्रकल्पाची वाट सामान्य पर्यटक, नागरिकांकरिता अत्यंत खडतर झाल्याचेच दिसून आले. केवळ खड्डे, डबके आणि चिखलाचे साम्राज्यच दिसून आले. मग, धरणापर्यंत पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
पुलगाव ते आर्वी मार्गावरील आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. तब्बल २०-२२ वर्षांनी मूर्त रूपात आलेल्या या प्रकल्पाबाबत नागरिकांत बरीच उत्सुकता होती. या प्रकल्पाला ‘वरूड बगाजी सागर’ असे नावही देण्यात आले; पण तेथील परिसर विकासाकरिता अद्याप कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असताना प्रकल्प पूर्ण झालेला नाही. कालव्याची कामे अद्यापही बाकी आहेत. प्रकल्पातून निघालेल्या मुख्य डाव्या कालव्याचे अद्याप अस्तरीकरणही करण्यात आलेले नाही. पूढे काही भागात कालव्याचे काम पूर्ण झाले; पण त्यातही गैरप्रकार झाल्याच्याच तक्रारी पूढे येत आहे. किमान प्रकल्पाने मूर्त रूप घेतल्यानंतर परिसर विकासाकडे लक्ष देत पर्यटक, नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करता आले असते; पण तसे झाले नाही. प्रकल्प आणि कालव्यांच्या कामांत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षच करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी सुस्थितीत असलेल्या आर्वी रोड ते मंगरूळ (दस्तगीर) या रस्त्यावर आज केवळ चिखलाचेच साम्राज्य आहे. जागोजागी खड्डे असल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पुलावरचे सिमेंटही गेले वाहून
निम्न वर्धा प्रकल्पाच्या समोरून गेलेल्या रस्त्यावर वर्धा नदीवर जुना पूल आहे. प्रकल्पानंतरही आर्वी रोड ते मंगरूळ हा रस्ता बंद होऊ नये म्हणून तो पूल जैसे थे ठेवण्यात आला आहे; पण त्या पुलाची अद्याप उंचीही वाढविण्यात आली नाही की डागडुजीही करण्यात आलेली नाही. परिणामी, प्रकल्पाची दारे उघडल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलावरील सिमेंट वाहून गेले आहे.
पुलावर अनेक ठिकाणी सिमेंटची परत वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. या पुलावर कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. परिणामी, पुलावर थोडेही पाणी असले की, सदर मार्गावरील रहदारी पूर्णत: ठप्प होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत सदर पुलाची उंची वाढविणे आणि रस्ता दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.