पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

By Admin | Updated: October 7, 2015 00:55 IST2015-10-07T00:55:44+5:302015-10-07T00:55:44+5:30

शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Lost pipeline repair authority | पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

सहा महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष : दररोज हजारो लिटर पाणी जाते वाहून
आर्वी : शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाईपलाईन फुटणे, व्हॉल्व्ह लिक होणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. एलआयसी कॉलनीतील पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शहरातील बसस्थानकाजवळ असलेला व्हॉल्व्ह लिक आहे. यातून दररोज पाणी वाहून जते. शिवाय सहा महिन्यांपासून एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली आहे. यातून सहा महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत संबंधित विभागाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या; पण अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शहरात जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील जाजूवाडी परिसरात प्राधिकरण विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे; पण यातूनही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कन्नमवारनगर, एलआयसी कॉलनी, सरस्वती कॉलनी या भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकानजीकच्या नाल्यातून गेली आहे. यातील व्हॉल लिक आहे. यामुळे पाणी वाहून जाते. शिवाय पांडुरंग महाराज मंदिरासमोरील सिमेंटच्या व्हॉलमधूनही दररोज सकाळ -सायंकाळ पाणी वाहून जाते. यामुळे परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे. रात्रीच्या सुमारास पाण्याची उंच धार सतत वाहत असते.
एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाण्याची पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या स्थितीत आहे. याबाबत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला लेखी व मौखिक तक्रार केली. यानंतरही अनेकदा लेखी तक्रारी केल्यात; पण अद्यापही पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी वाहून जात असल्याने परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे.
नळ सोडल्यानंतर दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने सहा महिन्यांच्या हिशेब केल्यास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत पाण्याची बचत करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. याबाबत जनजागृतीही केली जात आहे; पण शहरात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याचा अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणने दखल न घेतल्याने दरोज रोडवर पाणी साचते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांचाही अभाव
शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्ह लिक असून पाईपलाईन फुटलेली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
शहरातील पाईपलाईन आणि व्हॉलच्या दुरूस्तीबाबत जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथे केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा केली असता प्रतिक्रीया देण्यासही नकारच देण्यात आला. यामुळे पाणी असेच वाया जाणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Lost pipeline repair authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.