कालवा पाझरल्याने शेताचे नुकसान
By Admin | Updated: May 7, 2017 00:37 IST2017-05-07T00:37:21+5:302017-05-07T00:37:21+5:30
पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे.

कालवा पाझरल्याने शेताचे नुकसान
बांधकामाला तडा : झुडुपांचा विळखा तर कुठे अर्धवट कामांमुळे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे. याची झळ पिकांना बसत असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. तालुक्यातील पेठअहमदपूर, परसोडा, खडकी, गोदावरी या चार मौजामधील अवस्था बिकट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अप्पर वर्धा धरण विभाग व तालुक्यातील तलावांमधून पिकांसाठी पाणी सोडल्या जाते. पेठअहमदपुर कडून परसोडाकडे जाणाऱ्या कालव्याला जागोजागी तडा गेल्या आहे. अर्धवट बांधकाम झाल्यामुळे कालव्यातून वाहणारे पाणी थेट शेतात साचत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कालवे विभागाला अवगत केले तरी दुरुस्ती केली नाही. या पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या बाजुला गटारगंगा तयार झाली आहे. कालवा आणि शेत याला लागून असलेल्या रस्त्याची यामुळे दुरवस्था निर्माण झाली आहे. बांधकाम करण्यासाठी खोदून ठेवलेल्या कालव्याची अवस्था खराब झाली आहे. गाळ साचला, झाडे-झुडपे वाढली, दगड पडल्याने पाणी सोडण्याचे गेट बंद झाले, अॅप्रोच मधून पाणी पाझरत आहे. काळ्या मातीमुळे बांधलेला भागही दबत असल्याने कालव्याचे भविष्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
शेतीला पाणी मिळावे याच हेतुने कालवे बांधण्यात आले. मात्र गत अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीला केराची टोपली मिळत आहे. आष्टी तलावाद्वारे बांधकाम झालेला कालवा देखील अर्धवट आहे. कालव्यात बाभळीची झाडे वाढली आहे. ती तत्काळ काढून साफसफाई करावी, लिकेज ठिकाणी दुरुस्ती करून शेतात पाणी पाझरणार नाही.
शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीच कालवे व पाटसऱ्या बांधण्यात आल्या. यातील दुरुस्ती व साफसफाई करण्याचे आदेश दिले असून पाणी सोडणारे व सफाई मजुर हे कामात दिरंगाई करीत असल्यास कारवाई करणार
- पी.पी. पोटफोडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे धरण विभाग अमरावती