दोघांना लुटले, एकाला फसविले
By Admin | Updated: September 22, 2014 23:23 IST2014-09-22T23:23:14+5:302014-09-22T23:23:14+5:30
आपण पोलीस आहोत, चोऱ्यांबाबत चौकशी सुरू आहे, तुमच्या जवळ असलेले सोन्याचे दागिने रूमालात बांधून खिशात ठेवा, असे म्हणत वर्धेतील आर्वी मार्गावर एका वृद्ध इसमाजवळील सोन्याची अंगठी

दोघांना लुटले, एकाला फसविले
वर्धेत तोतया पोलिसांचा प्रताप : हिंगणघाट येथे इसमाची अंगठी पळविली
वर्धा : आपण पोलीस आहोत, चोऱ्यांबाबत चौकशी सुरू आहे, तुमच्या जवळ असलेले सोन्याचे दागिने रूमालात बांधून खिशात ठेवा, असे म्हणत वर्धेतील आर्वी मार्गावर एका वृद्ध इसमाजवळील सोन्याची अंगठी व सोनसाखळी लंपास केली. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली. या व्यतिरिक्त टायरचे डिलर असल्याचे सांगत येथील एका व्यापाऱ्याला ४५ हजार रुपयाने गंडा घालण्यात आला.
आर्वी नाका येथील रामराव पडोळे (७२) हे एका कार्यक्रमातून घराकडे परत जात होते. दरम्यान आर्वी मार्गावर दोन युवकांनी त्यांना अडविले. आम्ही पोलीस आहोत, चौकशी सुरू आहे. तुमच्याकडे असलेली सोन्याची अंगठी व सोनसाखळी काढून रूमालात बांधा, असे म्हणताच पडोळे यांनी त्यांच्या बोटातील अंगठी व गळ्यातील सोनसाखळी काढत ती खिशात टाकली; मात्र या तोतया पोलिसांनी त्यांना अंगठी खिशात न टाकता रूमालात बांधण्याचे सांगितले. यावर खिशातून रूमाल काढून त्यात अंगठी व सोनसाखळी ठेवताच या चोरट्यांनी त्यांच्या हातातील रूमालाला हिसका देत पळ काढला. हे दोन्ही युवक काळण्या रंगाच्या दुचाकीवर असल्याचे पडोळे यांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही घटनेत शहर ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
रस्त्यावरून सोन्याची अंगठी व सोनसाखळ पळविणाऱ्या चोरट्यांचा शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग व नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही.
शहरात या प्रकारच्या चोऱ्या होण्याचे प्रकार सुरूच असून यावर आळा बसविण्यात शहर पोलिसांना अपयश येत आहे. (प्रतिनिधी)