वर्धेच्या दक्षिणेकडे बायपास मार्गाचा प्रस्ताव लोकसभेत

By Admin | Updated: April 28, 2016 01:54 IST2016-04-28T01:54:40+5:302016-04-28T01:54:40+5:30

शहराला उत्तर दिशेला बाह्य वळण (बाय पास) असल्याने अनेक जड वाहने बाहेरून आवागमन करतात पण दक्षिण दिशेलासुद्धा बाह्य वळण (बायपास) निर्माण होणे गरजेचे आहे.

In the Lok Sabha, Proposal bypass is south of Wardha | वर्धेच्या दक्षिणेकडे बायपास मार्गाचा प्रस्ताव लोकसभेत

वर्धेच्या दक्षिणेकडे बायपास मार्गाचा प्रस्ताव लोकसभेत

रामदास तडस यांची माहिती : शून्य प्रहरात मांडला मुद्दा
वर्धा : शहराला उत्तर दिशेला बाह्य वळण (बाय पास) असल्याने अनेक जड वाहने बाहेरून आवागमन करतात पण दक्षिण दिशेलासुद्धा बाह्य वळण (बायपास) निर्माण होणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जड वाहनांचे शहरातून होणारे आवागमन अश्या अनेक समस्या दक्षिण भागाला बाह्य वळण रस्ता नसल्याने वर्धा शहरासमोर उभ्या आहेत. ही प्रमुख समस्या लक्षात घेवून खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये शून्य काळात मुद्दा उपस्थित करून याकरिता केंद्रीय मार्ग निधी योजना २०१६-१७ अंतर्गत मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे रेटून धरली.
वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु राज्य शासनाने मार्च २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याच्या अधिग्रहणाकरिता भरीव तरतूद उपलब्ध करून दिल्याने हा मुद्दा लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला आहे.
वर्धा शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जड वाहतूक पूर्णपणे शहराबाहेरून होणे अपेक्षित आहे. शहराच्या दक्षिण भागाला अनेक मोठे उद्योग असून वर्धा औद्योगिक वसाहत सुद्धा याच दिशेला वसली आहे. वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याचा विषय मार्गी लागल्यास औद्योगिक घटकांना फायदा होणार आहे. तसेच वर्धा शहरातून होणाऱ्या जड वाहनांचा त्रास सुद्धा कमी होणार आहे.
सदर बायपास रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लागावा, याकरिता येत्या काही दिवसात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेवून सदर प्रश्न प्रभावीपणे मांडणार असल्याची माहिती खा. तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: In the Lok Sabha, Proposal bypass is south of Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.