वडगाव आरोग्य उपकेंद्राला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: August 8, 2014 00:08 IST2014-08-08T00:08:02+5:302014-08-08T00:08:02+5:30
कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही, असा आरोप करीत संतप्त झालेल्या नागरिकांनी वडगाव येथील आरोग्य उपकेंद्रालाच कुलूप ठोकले.

वडगाव आरोग्य उपकेंद्राला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
आकोली : कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही, असा आरोप करीत संतप्त झालेल्या नागरिकांनी वडगाव येथील आरोग्य उपकेंद्रालाच कुलूप ठोकले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
प्राप्त माहितीनुसार, झडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या वडगाव येथील उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. येथील परिचारिका गत अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना तसेच उपचारार्थ जाणाऱ्या रुग्णांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
येथील परिचारिका शहरातून ये-जा करीत असल्याने उशिराने कार्यालयात पोहचत असते. नियमानुसार परिचारिकेने मुख्यालयी राहणे अनिवार्य असून रात्रपाळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र येथील परिचारिका रात्रपाळीत बरेचदा अनुपस्थित राहत आली आहे. यामुळे येथील रुग्णांच्या सेवेत नेहमीच अडसर निर्माण होत आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्रालाच कुलूप लावले.
यावेळी सेलू पंचायत समितीचे उपसभापती उल्हास रननवरे, जिल्हा परिषद सदस्य साबळे, पं.स. सदस्य मंजुषा पारधे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.(वार्ताहर)