वैद्यकीय अधीक्षकाच्या खासगी रुग्णालयाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: December 22, 2015 03:11 IST2015-12-22T03:11:04+5:302015-12-22T03:11:04+5:30
येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शकील अहमद यांच्या खासगी रुग्णालयाला

वैद्यकीय अधीक्षकाच्या खासगी रुग्णालयाला ठोकले कुलूप
कारंजा (घाडगे): येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शकील अहमद यांच्या खासगी रुग्णालयाला शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास एका आंदोलनादरम्यान कुलूप ठोकले. शासकीय रुग्णालयात कार्यरत असतानाही या वैद्यकीय अधिकाऱ्याने खासगी रुग्णालय थाटले, शिवाय रुग्णांना शासकीय रुग्णालयात औषधोपचार न करता आपल्या खासगी रुग्णालयात बोलावल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
एन.पी.ए. सुरू असल्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या वेळात खासगी रुग्णालयात काम करू नये, खाजगी दवाखाना चालवायचा असल्यास रात्री ७ वाजतानंतर चालवावा आणि सरकारी दवाखान्यात नियमीत सेवा द्यावी, असा शिवसेना कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
या आशयाचे पत्रसुध्दा शिवसेना उपाध्यक्ष देशमुख यांनी डॉ. शकील यांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. एवढेच नव्हे तर डॉ. शकील यांच्या बद्दलची लेखी तक्रार आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
या तक्रारीची चौकशी सुरू असताना सोमवारी शिवसेना उपाध्यक्ष देशमुख, शहर प्रमुख संदीप टिपले आणि तालुका प्रमुख प्रकाश घागरे व इतर कार्यकर्त्यांनी रुग्णालय गाठत कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)