उत्पादन शुल्क कार्यालयाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 4, 2016 01:38 IST2016-10-04T01:38:47+5:302016-10-04T01:38:47+5:30
दारूबंदी जिल्ह्यात येत असलेली दारू पकडण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन

उत्पादन शुल्क कार्यालयाला ठोकले कुलूप
जनवादी महिला संघटनेचे आंदोलन : कुलुपाची किल्ली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली
वर्धा : दारूबंदी जिल्ह्यात येत असलेली दारू पकडण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात येत नाही. केवळ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे म्हणत हा विभाग दारूविक्रेत्यांच्या पाठीशीच उभा राहतो. जर कारवाई करणे शक्य नसेल तर जिल्ह्यात या कार्यालयाची गरज काय, असे म्हणत अखिल भारतीय जनवादी महिला संटनेच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला सोमवारी कुलूप ठोकत त्याची किल्ली जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हवाली केली.
जिल्ह्यात दारूबंदी आहे. अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभाग आहे. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याकरिता दोन विभाग असताना केवळ पोलिसांकडूनच दारू पकडण्यात येत आहे. दारू पकडण्याची ही कारवाई करताना पोलिसांकडून दारूविक्रेत्यांशी मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यामुळे त्यांच्याकडून होत असलेली कारवाई नावालाच असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
दारूबंदीचा कायदा कडक करण्यात येत असला तरी जिल्ह्यात होत असलेल्या या दारूविक्रीवरून त्याचा काही उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. या संदर्भात शासनाला निवेदने दिली मात्र त्यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. असे असतानाही दारू पकडण्याची विशेष जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात दारू पकडण्याची कुठलीही कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आमच्याकडे कर्मचारी संख्या नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. जर शासनाकडून या विभागाला कर्मचारी पुरविणे शक्य नाही, तर हा विभाग सुरू कशाला ठेवायचा असे म्हणत सोमवारी जनवादी महिला संघटनेच्यावतीने कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
कुलूप ठोकल्यानंतर या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत कुलूपाच्या किल्ल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्षा प्रभा घंगारे, जिल्हा अध्यक्षा प्रतिक्षा हाडके, जिल्हा सेक्रेटरी दुर्गा काकडे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
संघटनेच्या निवेदनातील मागण्या
४जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्धेत होणारी अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील आवक बंद करावी.
४यवतमाळ, नागपूर, अमरावती येथील परवानाधारक दारूविक्रेते व बारचे मालक वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी अवैधपणे दारू पुरवितात, त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे रेकॉर्ड, बीले, स्टॉक बुक वेळोवेळी तपासावे. परवानाधारक दारूविक्रेत्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे.
४राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, वर्धा यांना यासाठी दोन चारचाकी जीपगाड्या, पुरेसा कर्मचारी वर्ग त्वरीत पुरवावा. वर्धा येथील रिक्त जागा त्वरीत भरून अतिरिक्त कर्मचारी वर्ग मंजूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या.