लॉकडाऊन, तरी वायफडात गावठी दारूविक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:18+5:30
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशातच वायफड येथील हनुमाननगर पारधी बेडा येथे गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे.

लॉकडाऊन, तरी वायफडात गावठी दारूविक्री जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनसह संचारबंदी असताना वायफड येथील पारधी बेड्यावर गावठी दारूविक्री जोमात सुरू आहे. दररोज मद्यपींची गर्दी उसळत असल्याने जमावबंदीसह सर्वच कायदे येथे पायदळी तुडविले जात आहेत. दारू गुत्थ्यावर कारवाई करावी, अशी मागणी वायफड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाणेदारांकडे केली आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशातच वायफड येथील हनुमाननगर पारधी बेडा येथे गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे.
या दारू गुत्थ्यावर वायफड गावातील आणि लगतच्या परिसरातील मद्यपींची नित्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असून कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची भीती आहे. बेड्यावर होणाºया मद्यपींच्या गर्दीला आळा घालत दारू अड्ड्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
दारूभट्टीचा धूर कायमच
दारूभट्टीकरिता मोठ्या प्रमाणावर लाकूडफाटा उपयोगात आणला जातो. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर वनविभागाने दखल घेत वायफड येथून दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली लाकूडफाटा जप्त केला. कारवाईनंतरही वायफड येथे दारूभट्ट्यांतून धूर निघणे मात्र बंद झाले नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पारडीत दारूचा महापूर
कारंजा (घा.) : कोरोनाच्या संकटकाळातही पारडी गावात दारूचे पाट वाहत आहेत. लगतच्या गावातील तळीराम येथे दारूची हौस भागवायला येतात. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. तळेगाव पोलिसांनी दारूविक्रीला आळा घालण्याची मागणी होत आहे. पारडी हे तालुक्याच्या अखेरच्या टोकाला जंगलालगत असलेले ३ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात जवळपास वीसहून अधिक गावठी दारूनिर्मितीच्या अवैध भट्ट्या आहेत. ही गावठी दारू गावात आणि शेजारच्या गावात विकली जाते. सभोवताल असलेल्या थारा, बोटोणा, एकांबा, सारवाडी, नारा, आजनादेवी या गावातील तळीराम येथे घेऊन दारू रिचवितात. त्यांच्या आवागमनामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.