भिडी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 31, 2015 03:00 IST2015-10-31T03:00:23+5:302015-10-31T03:00:23+5:30
ग्रामपंचायत कार्यालय भिडी येथील ग्रामविकास अधिकारी कार्यालयात वेळेत हजर राहत नसल्याने नागरिकांना विनाकारण कामाकरिता ताटकाळत रहावे लागले.

भिडी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
सीईओंना साकडे : ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अनागोंदीने नागरिक त्रस्त
वर्धा : ग्रामपंचायत कार्यालय भिडी येथील ग्रामविकास अधिकारी कार्यालयात वेळेत हजर राहत नसल्याने नागरिकांना विनाकारण कामाकरिता ताटकाळत रहावे लागले. यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. याकडे वरिष्ठांचे लक्ष देण्याकरिता वेळोवळी निवेदन देण्यात आले. मात्र त्याचा काहीच लाभ झाला नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
येथील नागरिकांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनानुसार येथील ग्रामसेविका जयश्री कुकुड्डे या ग्रामपंचायत कार्यालयात कधीही वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे गरीब जनतेला विविध कामांकरिता त्रास होत आहे. सदर ग्रामविकास अधिकारी या सभेच्या दिवशी सरपंचांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत लेखा-जोखा व्यवहाराविषयी संपूर्णपणे कागदपत्र दाखवत नाही व त्याविषयी सुद्धा उडवा-उडवीचे उत्तरे देतात.
अधिकाऱ्याच्या या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा वसुली नाही. पाणी पुरवठा योजनेचे विजेचे देयक २ लाख ५० हजार रुपये थकित आहे. ही मोठी ग्रामपंचायत असून अधिकाऱ्यांच्या अनागोंदीमुळे गावाचा विकास खोळंबल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीमधील सर्वच कागद तपासण्याची गरज आहे. ग्रामपंचायतची मासिक सभा किंवा ग्रामसभा असो त्या दिवशी सुद्धा ग्रामपंचायत लेखा-जोखा व्यवहाराचे रजिस्टर त्या दाखवत नाही. ग्रामपंचायतचे पैशाचा वापर या अधिकारी स्वत:च्या लाभाकरिता करीत असल्याचा आरोप येथील ग्रामपंचायत समितीच्या सदस्यांसह गावकऱ्यांनी निवेदनातून केला आहे.(प्रतिनिधी)