कर्ज देऊन शेतकऱ्यांची ७़३० लाखांनी फसवणूक
By Admin | Updated: January 18, 2015 23:14 IST2015-01-18T23:14:44+5:302015-01-18T23:14:44+5:30
आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची

कर्ज देऊन शेतकऱ्यांची ७़३० लाखांनी फसवणूक
आयसीआयसीआय बँकेचा प्रताप : आणखी एका शेतकऱ्याची तक्रार
प्रशांत हेलोंडे - वर्धा
आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली असून आणखी एका शेतकऱ्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ सदर शेतकऱ्याचेही २ लाख रुपये दलालाने फस्त केले़ या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे़
हिंगणघाट आयसीआयसीआय बँकेने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर कर्ज मंजूर केले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येकी पाच ते सात कोरे धनादेश स्वीकारले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ यात पोहणा येथील विवेक बोकारे यांना पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार, कृष्णाजी दुधलकर यांना २ लाख ४३ हजार, गजानन वानखडे यांना १ लाख ७७ हजार ६३१ रुपये तर नानाजी झाडे यांना ४ लाख ६० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले़
यातील बहुतांश रक्कम कोऱ्या धनादेशाच्या बळावर दलालांनीच हडप केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजारांचा फटका बसला़ राहुल त्र्यंबकराव वानखेडे रा़ पोहणा यांनाही बँकेने ८ लाख ५७ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले़ यांचे २ लाख रुपये हेमंत गोल्हर याने धनादेश क्ऱ ९४७१ नुसार विड्रॉल केली़ मुकेश रोडे, रोहन महाजन व हेमंत गोल्हर यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ७ लाख ३० हजार रुपयांनी पाच शेतकऱ्यांना फसविले़
या प्रकरणी पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली़ शिवाय विवेक बोकारे, नानाजी झाडे, गजाजन वानखेडे व कृष्णा दुधलकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले़ या प्रकरणी आयआयसीआय बँक कर्मचारी व दलालांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे़
पोलिसांचा तपासही कुचकामी
याबाबत पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली; पण गुन्हे दाखल करण्याशिवाय कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
बँकेने काढले हात
याबाबत आयसीआयसीआय बँक हिंगणघाटचे शाखा व्यवस्थापक अमीत घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बँकेशी दलालांचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले़ यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बँक हात झटकत असल्याचे दिसते़