पीक कर्जासाठी प्रथमच मंडळस्तरावर कर्ज मेळावे
By Admin | Updated: May 25, 2016 02:16 IST2016-05-25T02:16:03+5:302016-05-25T02:16:03+5:30
खरीप पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पहिल्यांदाच मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पीक कर्जासाठी प्रथमच मंडळस्तरावर कर्ज मेळावे
वर्धा : खरीप पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पहिल्यांदाच मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२७) मेळाव्याला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा व्हावा यासाठी महसूल, कृषी व बँकेच्या प्रतिनिधीसमवेत संयुक्त कृषी कर्ज मेळावा मंडळस्तरावर दि. २७ मे, ३ जून व १० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार असून गतवर्षी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण करण्यात येणार आहे. यात मंडळ व गावनिहाय प्रत्येक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल. यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खातेदारांच्या यादीचे काम सुरू
वर्धा : तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्याकडून गावनिहाय पात्र खातेदारांची यादी तयार करण्यात येत आहे. पात्र खातेदारांपैकी कर्ज न घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांना मंडळ स्तरावरील पीक कर्ज मेळाव्यात कर्ज पुरवठा मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
पीक कर्ज मेळाव्यास सर्व संबंधित अधिकारी, बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. पीक कर्ज मेळाव्यात सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
वर्धा महसूल विभागातील वर्धा तालुक्यांतर्गत वर्धा, आंजी (मोठी), वायफड, सेवाग्राम, वायगाव (नि.), सालोड हिरापूर, तळेगाव (टा.) येथे मेळावा होणार आहे. सेलू तालुक्यांतर्गत सेलू, सिंदी, हिंगणी, झडशी व केळझर येथे तर देवळी तालुक्यातील पुलगाव, भिडी, गिरोली, विजयगोपाल, अंदोरी व देवळी येथे मेळावा होईल. हिंगणघाट विभागात हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ), अल्लीपूर, वडनेर, कानगाव, पोहणा, वाघोली व सिरसगाव तसेच समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, मांडगाव, गिरड, नंदोरी, कांढळी, कोरा, वायगाव (गोेंड) व जाम येथे मेळावा आहे. आर्वी विभागातील आर्वी तालुक्यात आर्वी, वाठोडा, खरांगणा (मो.), विरूळ (आकाजी), रोहणा, वाढोणा, आष्टी तालुक्यात आष्टी, साहुर, तळेगाव (श्या.पं.) तर कारंजा तालुक्यात कारंजा, कन्नमवारग्राम, सारवाडी व ठाणेगाव येथे मेळावे घेणार आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)