लॉएड्स विद्यानिकेतनमध्ये आरटीईला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 01:50 IST2015-04-29T01:50:53+5:302015-04-29T01:50:53+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार नियमात बसत असलेल्या शाळेत २५ टक्के प्रवेश देण्याचे शासनाचे आदेश असताना भूगाव येथील लॉएड्स विद्यानिकेतनमध्ये या कायद्याला बगल देण्यात येत आहे.

लॉएड्स विद्यानिकेतनमध्ये आरटीईला बगल
वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार नियमात बसत असलेल्या शाळेत २५ टक्के प्रवेश देण्याचे शासनाचे आदेश असताना भूगाव येथील लॉएड्स विद्यानिकेतनमध्ये या कायद्याला बगल देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या शाळेची चौकशी करून तिची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय या भागात कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणाची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
या शाळेत हा प्रकारा गत तीन वर्षांपासून सुरू आहे. या तीन वर्षांत एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात शाळेविरोधात कारवाई कराण्याकरिता तक्रार नव्हती; मात्र आता दीपक तपासे नामक पालकाने या संदर्भात तक्रार केली आहे. तपासे यांनी त्यांच्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश देण्याकरिता अर्ज सादर केला होता; मात्र त्यांना कोणतेही कारण न सांगता पाल्याला प्रवेश देण्यात आला नाही. याची तक्रार त्यांनी शिक्षणविभागाला दिली आहे. यावरुन जि.प.चे उपशिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांना शाळेत चौकशी करण्याकरिता पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय पालकाशी अरेरावी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेच्या आवारात असलेल्या प्रदूषणावरही लक्ष वेधण्यात आले आहे.(प्रतिनिधी)