तरूणांनी दिले इंडियन गोल्डन ओरियलला जीवदान

By Admin | Updated: May 18, 2017 00:34 IST2017-05-18T00:34:47+5:302017-05-18T00:34:47+5:30

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी दुपारी सूर्यनारायण आगच ओकत आहे.

Lives of Indian Golden Oryl | तरूणांनी दिले इंडियन गोल्डन ओरियलला जीवदान

तरूणांनी दिले इंडियन गोल्डन ओरियलला जीवदान

भूतदयेचा दिला परिचय : तळपत्या उन्हामुळे पशुपक्ष्यांचे जीवनमान प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी दुपारी सूर्यनारायण आगच ओकत आहे. दुपारच्या वेळेत तळपत्या उन्हात हिरव्या रंगाचा एक पक्षी स्थानिक सराफा लाईन भागात अस्वस्थ होत जमिनीवर पडला. हा प्रकार या भागातील काही तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी पक्ष्याला जवळ घेत पाणी पाजले. थोड्या वेळानंतर पक्षी पुर्वस्थितीत आल्यावर त्याने आकाशात भरारी घेतली. आकर्षक दिसणारा हा पक्षी इंडियन गोल्डन ओरीयल असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी पारा ४५.५ अंशावर असताना उन्हाचे चांगले चटकेच बसत होते. यावेळी पक्षी जमिनीवर पडून पाण्याअभावी मृत्यूशी झुंज देत होता. यावेळी उपस्थित असलेल्या जगरुक तरुणांनी पक्ष्याची सुश्रुषा केली. एकूणच तरूणांच्या सतर्कतेमुळे या पक्ष्याचे प्राण वाचले. हा पक्षी दुर्मिळ प्रकारात नसला तरी मानवी वसाहतीत तो फारसा नजरेस पडत नाही. पक्ष्याचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने तरूणांचे कौतुक होत आहे. तसेच ठाकरे मार्केट परिसरात एक पक्षी उन्हामुळे भोवळ येऊन पडला असताना युवकांनी त्याला जीवदान दिले.

हिरवळीच्या ठिकाणी करतो वास्तव्य
हळद्या या प्रजातिच्या पक्ष्याची मादी पिवळसर-हिरव्या रंगाची असते. पोट पांढऱ्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाच्या छटा असतात. तसेच छातीच्या कडेला पिवळ्या रंगाच्या छटा असतात. चोच काळ्या रंगाची असते. हा पक्षी जंगली भागात व हिरवळीच्या ठिकाणी वास्तव्य करतो.

फळे व किडे मुख्य खाद्य
हळद्या या पक्ष्याचे मुख्य खाद्य फळे व किडे आहे. त्याचा प्रजनन काळ हा एप्रिल ते आॅगस्ट दरम्यानचा असतो. त्याचे घरटे झाडावर उंच ठिकाणी टोकावरच्या फांदीवर छोट्या आकाराचे असते. हे पक्षी २ ते ३ अंडे देत असून अंडे पांढऱ्या रंगाचे व त्यावर लाल बुट्टे व काळे ठिपके असतात.
दक्षिणेकडे करतो स्थलांतर
हा पक्षी थंडीच्या काळात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. प्रौढ नराचे डोळ्याजवळ काळ्या रंगाचे पट्टे असतात. डोळे व शरीर सोनेरी पिवळसर असते. त्याचे पंख मोठे असून त्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे असतात तसेच पंख निमुळते टोकदार असतात. त्याला काळी पिवळी शेवटी असते.

भारतातील स्थायी पक्षी
इंडियन गोल्डन ओरिअल या पक्ष्याला मराठीत हळद्या असे म्हटले जाते. या पक्ष्याची लांबी २५ से.मी. असते. उन्हाळ्यात हा पक्षी बहुतेक बलुचिस्थान व हिमालयात स्थलांतरीत होतो. हा पक्षी उत्तर व मध्य भारतातील स्थायी पक्षी आहे.

 

Web Title: Lives of Indian Golden Oryl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.