१५० हेक्टरमधील पिकांना जीवदान

By Admin | Updated: July 11, 2015 02:39 IST2015-07-11T02:39:12+5:302015-07-11T02:39:12+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हमदापूर येथील नाल्यावर सिमेंटनाला बांध यासह ४०० मीटर नाला खोलीकरणामुळे पहिल्याच पावसात...

Lives of crops in 150 hectares | १५० हेक्टरमधील पिकांना जीवदान

१५० हेक्टरमधील पिकांना जीवदान

जलयुक्त शिवार अभियान : हमदापूर येथील सिमेंट नाल्यावर बांध, १०.९० दशलक्ष घनमीटर जलसाठा
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हमदापूर येथील नाल्यावर सिमेंटनाला बांध यासह ४०० मीटर नाला खोलीकरणामुळे पहिल्याच पावसात १०.९० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी डिझेल पंपाद्वारे जलयुक्त शिवार अभियानाचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. या अभियामुळे तब्बल १५० हेक्टरमधील पिकांना जीवदान मिळाले आहे.
सेलू तालुक्यातील हमदापूर तसेच आर्वी (छोटी) येथे कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नालाबांध व नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी बी. के. वाघमारे, कृषी पर्यवेक्षक एस. डी. गुट्टे, कृषिसेवक पी. बी. गरूड, ए. एम. रूपनार, देवरे आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील हमदापूर या गावात नालाखोलीकरणाचे काम घेण्यात आले. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी तसेच शेतीला शाश्वत सिंचन मिळावे यासाठी ९ लख खर्च करून ४०० मीटर लांब नाल्याचे खोलीकरण करण्यात आले.
पहिल्याच पावसात अडीच मीटर खोल असलेल्या नाल्यात १० दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध झाला. त्यासोबतच परिसरातील १० ते १५ विहिरीतील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीत तसेच विंधन विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गावात पिण्याचे पाणीही उपलब्ध झाले आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे हमदापूर हे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले आहे. लोकसभागातून नालाखोलीकरण तसेच उपलब्ध झालेल्या पाण्याच्या वापरासाठी पुढाकार घेऊन गावातील पाणी टंचाईवर मात झाली असल्याचे सरपंच संजय देशमुख यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामुळेच पिके वाचविणे शक्य झाल्याचे स्थानिक शेतकरी सांगिअत आहे. याच प्रकारचा उपक्रम इतरही गावांमध्ये लोकसहभागातून राबवावा अशी मागणीही होत आहे.
हमदापूर या गावाची निवड करताना शिवारातून वाहत असलेला नाला पूर्णपणे गाळाने भरला होता. त्यामुळे पावसाळ्यातील पुरात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत होते. तसेच पावसाळ्यात गावातून वाहत जाणारे पाणी नाल्यात शिरून ते गावात शिरत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे सात हजार टीसीएम पिण्याची गरज भागविणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना पिकांसाठी ६ हजार ३१ टीसीएम पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांमुळे शेतीला सुरक्षित सिंचन व रब्बी हंगामातही पीक घेणे शक्य होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बी. के. वाघमारे यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नाला खोलीकरणामुळे गावाला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे शेतीतील उत्पादनामध्येही निश्चितच वाढ होईल.
तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन घेणे शक्य होऊन आर्थिक मदतीमुळे सामाजिक परिस्थितीत बदल होत असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Lives of crops in 150 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.