अडी-अडचणीतून शाळाशाळांत ‘लाईव्ह मोदी’
By Admin | Updated: September 6, 2014 02:14 IST2014-09-06T02:14:50+5:302014-09-06T02:14:50+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या सूचना शिक्षकांना मिळाल्या. या सूचना मिळताच शिक्षकांनी टीव्ही, केबल, इंटरनेट आदी साहित्य ...

अडी-अडचणीतून शाळाशाळांत ‘लाईव्ह मोदी’
वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या सूचना शिक्षकांना मिळाल्या. या सूचना मिळताच शिक्षकांनी टीव्ही, केबल, इंटरनेट आदी साहित्य गोळा करण्याची धावपळ सुरू केली. साहित्य गोळा केल्यानंतर अखेर भाषणाचा शिक्षक दिन उजळला. आपण गोळा केलेल्या साहित्यात सारे भागणार ना याची शाश्वती शिक्षकांकडून करण्यात आली. चाचपणी करतानाच दुपारी ३.१५ वाजता भाषणाला प्रारंभ झाला. सायंकाळी ४.४५ वाजता भाषणाचा शेवट झाला. हा दीड तासांचा कालावधी शिक्षकांकरिता चांगलीच कसरतीचा ठरला. या कार्यक्रमाचा अहवाल तयार करावयाचा असल्याने शिक्षकांनी अनेक अडीअडचणीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे भाषण ऐकविल्याचे चित्र शुक्रवारी जिल्ह्यात बघायला मिळाले.
बहुतेक शाळांमध्ये स्वयंशासन हा उपक्रम राबविला जातो. या दिवशी चपराशी, शिक्षकांपासून तर मुख्याध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना पार पाडावयाची असते. परंतु यंदा नाविण्यपूर्ण बाब ठरली ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण. सर्वप्रथम हे लाईव्ह भाषण प्रत्येक शाळेत दाखविल्या जाणे बंधनकारक असल्याचे पत्र शिक्षण विभागाद्वारे शिक्षणाधिकारी कार्यालयात धडकले होते. त्यानुसार सर्व शाळांमध्ये आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू झाले होते. शहरातील शाळांसाठी ही बाब तितकी कठिण नसली तरी ग्रामीण भागात ही तजवीज करताना शिक्षकांची चांगलीच धांदल झाली. यासाठी आवश्यक असलेले टिव्ही, रेडिओ, इंटरनेट कनेक्शन अशा साहित्याची तजवीज करण्याची जबाबदारी शाळांवरच टाकल्यामुळे शिक्षकांमध्ये सर्वत्र नाराजी पसरली होती. गुरुवारपर्यंत शिक्षण विभागाने हे भाषण दाखविणे बंधनकारक नसल्याचा दुसरा आदेश पाठविल्याने शिक्षकांना जरी हायसे वाटले असले तरी यासंदर्भातील अहवाल प्रत्येक शाळेला पाठवायचा असल्याने शाळांनी मोदी लाईव्ह दाखविण्याची खटपट पूर्ण केली. यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. गोंगाटामुळे नेमके भाषण काय झाले हे बहुतेक विद्यार्थ्यांना कळलेच नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)