‘लिंक फेल’चा शेतकऱ्यांना फटका
By Admin | Updated: May 17, 2015 02:31 IST2015-05-17T02:28:52+5:302015-05-17T02:31:12+5:30
सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते.

‘लिंक फेल’चा शेतकऱ्यांना फटका
वर्धा : सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. शनिवारीही काही वेळ असाच प्रकार सुरू असल्याने नागरिकांना ताटकळावे लागते़ सध्या शेतकऱ्यांना ‘नो-ड्यू’ प्रमाणपत्रांची गरज असताना लिंक फेलचा खेळ सुरू असल्याने त्यांना आल्या पावलीच परतावे लागत आहे़ याबाबत भारत संचार निगमकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत़
नाचणगाव ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे अनेक वर्षांच्या मागणीनंतर स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा स्थापन करण्यात आली़ स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांचे व्यवहार या बँकेमार्फत चालतात. दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही तसेच बहुतांश व्यवहार एसबीआयमधूनच होत असल्याने व्यापारी, नागरिकांसह शेतकऱ्यांचीही त्याच बँकेकडे धाव असते़ सध्या शेती कामाची व लग्नसराईची धूम आहे़ यामुळे पैसे काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी असते. रोखीचे व्यवहार थोडे कमी झाल्याने नागरिक अधिक पैसा हाताशी न ठेवता तो बँकेत जमा करतात; पण गत तीन दिवसांपासून येथील बीएसएनएल कनेक्शनमध्ये बिघाड आल्याने येथील लिंक फेल झाली आहे. शनिवारीही नाचणगाव येथील एसबीआयमध्ये दारातच ‘लिंक फेल असल्याने कामकाज बंद आहे’ असा फलक पाहावयास मिळाला़
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना कर्जाची जुळवाजुळव करावयाची आहे़ यासाठी प्रत्येक बँकेतून ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र आणणे शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहे़ शिवाय राष्ट्रीयकृत बँका व सोसायट्या यांना अधिक महत्त्व आहे़ यामुळे सर्वप्रथम शेतकरी स्टेट बँक आॅफ इंडियामध्येच नो ड्यू प्रमाणपत्र घेण्याकरिता जातात; पण गत तीन दिवसांपासून लिंक फेल असल्याने बँकेचे कामकाज ठप्प आहे़ नाचणगाव शाखेत वर्ग केलेल्या शेतकरी खातेदारांना पुलगाव वा अन्य शाखांतून सदर प्रमाणपत्र दिले जात नाही़ यामुळे शेतकऱ्यांना नाचणगाव शाखेतून प्रमाणपत्र न मिळाल्यास रित्या हाताने परत जावे लागत असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)
पुलगावात एटीएम बंदमुळे खातेदार त्रस्त
नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत तर पुलगाव येथील एसबीआयचे रेल्वे स्थानकावर लागलेले एटीएम गत अनेक दिवसांपासून बंद आहे़ यामुळे शहरातील एसबीआयच्या ग्राहकांना एकाच एटीएमवर विसंबून राहावे लागते़ बँक आॅफ इंडियाचीही शहरात दोन एटीएम आहेत़ यातील एक एटीएम महिन्यातून १५ दिवस बंद असते़ यामुळे ग्राहकांना शहरातील सर्व एटीएम तपासावे लागत असल्याचे दिसते़
रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले एटीएम शहरातील नागरिकांसह प्रवाश्यांकरिता अत्यंत महत्त्वाचे असते; पण गत आठ ते दहा दिवसांपासून सदर एटीएम बंद आहे़ तेथील शटरवर तांत्रिक बिघाडामुळे एटीएम बंद असल्याचे नोंदविण्यात आले आहे़ दहा दिवसांपासून एटीएम मशीनचा बिघाडच दुरूस्त झाला नसल्याचेच यावरून दिसते़ याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तरी जलद कारवाई होत नसल्याने शहरातील खातेदारही त्रस्त झाले आहेत़ असाच प्रकार बॅक आॅफ इंडियाच्या एटीएमचा असून तेही सदोदित बंदच राहत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत़