जि़प़ शिक्षकांच्या आपसी बदल्यांना आदेशाची वाट
By Admin | Updated: April 30, 2015 01:49 IST2015-04-30T01:49:43+5:302015-04-30T01:49:43+5:30
प्राथमिक शिक्षक तसेच गड क व ड च्या २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या ...

जि़प़ शिक्षकांच्या आपसी बदल्यांना आदेशाची वाट
वर्धा : प्राथमिक शिक्षक तसेच गड क व ड च्या २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या जि़प़ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदलीबाबत ग्रामविकास विभागाने निर्णय जारी केला़ त्यानुसार दिवाळीनंतर सुट्टीत व मे २०१५ च्या सर्व साधारण बदल्यांपूर्वी सुट्टीच्या कालावधीत सदर बदल्या कराव्यात, असे निर्देश आहेत़ इतर जिल्ह्यांत वेळेत सुरू झालेली ही कार्यवाही वर्धा जि़प़ शिक्षण विभागात प्रलंबित होती़ ती सुरु होण्याचे संकेत आहे.
बदल्यांसाठी शासन निर्णयातील अटीनुसार पात्र शिक्षकांनी पं़स़ मार्फत जि़प़ कडे मे २०१५ पर्यंत अर्ज सादर करायचे आहे़ २०११ व २०१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर व सहायक शिक्षक हे तालुक्यात जाऊ शकतील़
आपसी बदलीचा अध्यादेश शिक्षकांसाठी यापूर्वी २८ आॅक्टोबर २०१३ व आता २२ आॅगस्ट २०१४ रोजी जारी झाला़ यानुसार आपसी बदलीसाठी २०११ व २०१२ मध्ये तालुक्याबाहेर प्रशासकीय बदली झालेले कर्मचारीच पात्र असतील; पण दुसरा उमेदवार उपलब्ध होत नसल्यास प्रशासकीय बदलीस पात्र कोणताही शिक्षक कर्मचारी आपसी बदलीस पात्र ठरविला जाईल़ आपसी बदलीस इच्छुक कर्मचाऱ्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे़ आपसी बदल्यांसाठी कोणत्याही टक्केवारीची मर्यादा नाही़
२०११, २०१२ मध्ये प्रशासकीय बदली झालेल्या आपसी बदल्यातील इच्छुक कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून सेवा कालावधीची अट लागू होणार नसल्याचे निर्णयात नमूद आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देत आपसी बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत अवगत केले होते़ (कार्यालय प्रतिनिधी)