पालिकेच्या हद्दीत नसताना भरमसाठ कर आकारणी
By Admin | Updated: February 5, 2015 23:14 IST2015-02-05T23:14:00+5:302015-02-05T23:14:00+5:30
रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर

पालिकेच्या हद्दीत नसताना भरमसाठ कर आकारणी
वर्धा : रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर परिषदेमध्येही येत नाही व ग्रामपंचायतीकडेही येत नाही़ यामुळे या वॉर्डाचा अद्यापही विकास झाला नाही़ असे असले तरी नगर परिषदेद्वारे नागरिकांना ३ ते ९ हजार रुपयांची पाणी कराची देयके देण्यात आलीत़ या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष असून याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
वर्धा नगर परिषद आणि सिंदी मेघे ग्रामपंचायत या दोन्ही स्वराज्य संस्था तुकाराम वॉर्ड त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत आहे़ यामुळे समस्या कुणाला सांगाव्या, असा प्रश्न नागरिकांना त्रस्त करीत आहे़ संपूर्ण वर्धा शहरात नुतनीकरण सुरू असून ग्रा़पं़ अंतर्गत अनेक भागांचाही विकास सुरू आहे; पण या भागात कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्यात आलेली नाही़ या भागातील नाल्या, रस्ते यांची दुरूस्ती अद्याप करण्यात आलेली नाही़ १५ ते १६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या, रस्ते आहेत़ त्यांची दुरवस्था झाली असून नाल्या फुटल्यात़ यामुळे पावसाळ्यात सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरते व नागरिकांची धावपळ होते़ काही ठिकाणी सांडपाणी तुंबलेल्या नाल्या व कचऱ्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या; पण उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़
नागरिकांनी जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन सादर केले़ यावर नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेशाला तिलांजली दिली़ उलट पालिकेने एका कुटुंबाला प्रतिवर्ष ३ हजार रुपये प्रमाणे पाणीकर आकारला़ २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या तीन वर्षांकरिता प्रत्येक कुटुंबाला ९ हजार रुपयांचे देयक देण्यात आले़ या भरमसाठ पाणी कर वसुलीच्या धोरणाविरूद्ध नागरिकांनी एल्गार पुकारला आहे़ सोमवारी (दि़२) लोकशाही दिनात तक्रार करीत पालिकेने आकारलेला कर कमी करून पूर्वीप्रमाणे वार्षिक ८५० रुपये करावा, १५ वर्षांपासून हद्दपार केलेला हा भाग पुर्ववत पालिकेत समाविष्ट करावा, विक्री झालेल्या घरांचे फेरफार करावे, नाल्या व रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, सार्वजनिक शौचालय पाडून उद्यान तयार करावे, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी विठ्ठल राऊत, वर्धमान माळोदे, दीपक अंबुलकर, रमेश फिरके, असटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)