काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ
By Admin | Updated: May 17, 2014 00:23 IST2014-05-17T00:23:48+5:302014-05-17T00:23:48+5:30
काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ
वर्धा : काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघात भगवा फडकाविला. तडस यांना तब्बल ५ लाख ३७ हजार ५१८ इतकी मते मिळाली, तर सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार मते मिळाली. ही मते २00९ च्या तुलनेत ३१ हजार ११८ मतांनी कमीच आहे. तिसर्या क्रमांकावर बसपाचे चेतन पेंदाम यांना ९0 हजार ८६६ मतांवरच समाधान मानावे लागले. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. त्यांना १५ हजार ७३८ मतांवरच आपला गाशा गुंडाळावा लागला. स्थानिक एफसीआयच्या गोडावूनमध्ये सकाळी ८.३0 वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ९ वाजता पहिल्या फेरीचे मतदान हाती आले. पहिल्या फेरीतच भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी तब्बल ८ हजार ८८८ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी फेरीगणिक वाढतच गेल्याने सागर मेघे यांचा पराभव आणखीच गडद होत गेला. २६ व्या अंतिम फेरीपर्यंत तडस यांची आघाडी २ लाख १५ हजार ७८३ पर्यंत गेली. अंतिम आकडेवारी येताच तडस यांना निवडणूक निर्णय अधिकारी एन. नवीन सोना यांनी विजयी घोषित केले. २00९ च्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार बिपीन कंगाले यांनी तब्बल १ लाख ३१ हजार ६८३ मते घेतली होती. या निवडणुकीत बसपाचे उमेदवार चेतन पेंदाम तिसरा क्रमांक अबाधित राखण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना मताधिक्य टिकविण्यात मात्र अपयश आले. चवथ्या क्रमांकावर आपचे अलीम पटेल असले तरी त्यांना अपेक्षेपेक्षा यश मिळविता आले नाही. निवडणूक निकालावर दृष्टी फिरविल्यास जिल्ह्यात चौफेर मोदीचीच जादू असल्याचे निकालातून दिसून आले. वर्धा लोकसभा मतदार संघातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तडस यांना सर्वाधिक ५६ हजार ११, तर मोर्शीत ५१ हजार ८७१ आघाडी मिळाली. धामणगाव २५ हजार ४२१, वर्धा ३६ हजार २७९ आणि देवळी विधानसभा क्षेत्रातून ३0 हजार ५२६ मतांची भर त्याच्या खात्यात पडली. आर्वीत भाजपाचे आमदार असताना मात्र येथे सर्वात कमी म्हणजे १५ हजार ३४0 मतांचेच मताधिक्य मिळाले. एकूणच सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले. इतर उमेदवार मात्र चमत्कार दाखवू शकले नाही.(जिल्हा प्रतिनिधी)