वाकलेल्या वीज खांबामुळे दुर्घटनेची शक्यता
By Admin | Updated: August 5, 2016 02:06 IST2016-08-05T02:06:36+5:302016-08-05T02:06:36+5:30
गावागावात वीज पोहोचविण्याकरिता असलेल्या तारांना आधार देण्याकरिता कंपनीच्यावतीने लोखंडी खांब उभे करण्यात येतात.

वाकलेल्या वीज खांबामुळे दुर्घटनेची शक्यता
वीज वितरणचे दुर्लक्ष : अपघात टाळण्याकरिता दुरूस्ती गरजेची
सेवाग्राम : गावागावात वीज पोहोचविण्याकरिता असलेल्या तारांना आधार देण्याकरिता कंपनीच्यावतीने लोखंडी खांब उभे करण्यात येतात. खांब पक्के बसावे याकरिता मोठा खड्डा करून त्यात सिमेंट काँक्रीट टाकण्यात येते; मात्र काही ठिकाणी त्या पद्धतीने खांब गाडले नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने खांब डळमळीत झाले आहे. जमिनीकडे वाकलेल्या या खांबामुळे जिवंत तारांचा स्पर्श होवून अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.
सेवाग्राम ते हमदापूर, बोंडसुला शिवारातील काही शेतातील वीज खांब वाकलेल्या अवस्थेत आहे. खांब वाकल्याने तारांवर ताण पडतो. पावसामुळे जमिनीकडील पकड कमकुवत झाल्याने खांब कोसळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे कंपनीने वेळीच या खांबाची डागडुजी करून संभाव्य अपघात टाळावा अशी मागणी करण्यात येत आहे. जुनोना येथील शेतकरी ज्ञानेश्वर घोडे यांच्या शेतातील असेच दोन खांब वाकलेले होते. धोका लक्षात घेवून घोडे यांनी सेलू येथील वीज कार्यालयात मे महिन्यात अर्ज दिला होता. स्मरणपत्र दिले. जून महिन्यात वीज खांब जमीनदोस्त झाल्यावरच वीज कार्यालयाची धावाधाव सुरू झाली. यात वीज पुरवठा खंडितवर निभावल्याने धोका टळला. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)