वीज भारनियमनाने रात्र शेतातच..!

By Admin | Updated: November 8, 2014 22:43 IST2014-11-08T22:43:24+5:302014-11-08T22:43:24+5:30

परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत

Lightning loads in the field in the night ..! | वीज भारनियमनाने रात्र शेतातच..!

वीज भारनियमनाने रात्र शेतातच..!

रोहणा : परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत करण्यासाठी जावे लागत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी मजूरवर्गही मिळत नसल्याने शेतमालकाला स्वत: रात्रीच्यावेळी ओलीत करण्याची वेळ आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दोन महिन्याआधी रोहणा परिसरात सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे दहा या वेळात तर गुरुवार ते रविवार या चार दिवशी सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहापर्यंत विद्युत पुरवठा केल्या जात होता. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस सकाळी शेतकरी ओलीत करु शकत होते. दरम्यान वीजवितरण कंपनीने बळीराजाला ओलिताची फार गरज असताना भारनियमन दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेतला.
सदर निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना दिवसा अधिकाधिक पुरवठा देण्याऐवजी दिवसाचा वेळ भारनियमनात समाविष्ट करून सोमवार ते बुधवार रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे आठ यावेळात तर गुरुवार ते रविवारी सकाळी पावणे अकरा ते सायंकाळी पावणेसहा यावेळात विद्युत पुरवठा देणे सुरू केले. त्यामुळे सोम, मंगळ व बुधवार सकाळी पावणे आठ लाच लाईन जात असल्याने हे तीन दिवस ओलीत करणे शक्य होत नाही.
याविरूद्ध शेतकऱ्यांनी ओरड केली असता स्थानिक कनिष्ठ अभियंत्याने हा बदल दोन तीन दिवसांसाठीच आहे. लवकरच जुन्याप्रमाणेच विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याची थाप मारून शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी केली. पण दोन महिन्याचा काळ उलटला तरी वाढीव भारनियमन कमी करण्यात आले नाही. तसेच सोमवार ते बुधवारला रात्री पावणे बाराऐवजी पावणे दोनला विद्युत पुरवठा सुरू करुन सकाळी पावणे दहापर्यंत विद्युत पुरवठा चालू ठेवला तरी दोन तासांचे वाढीव भारनियमन होते व सकाळी दोन ते तीन तास शेतकरी ओलीतही करू शकतो. पण हा पर्याय देखील कंपनीने स्वीकारला नाही.
कंपनीची मानसिकता शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सुखाने घरी झोपू द्याची नसल्याने अनेक शेतमालकांना आठवड्यातील तीन दिवस रात्रीला ओलीत करावे लागते. शेतात अंधार असतो. जमिनीला भेगा पडल्याने या भेगात सरपटणारे प्राणी असतात. पिकात गवत वाढलेले असते अशावेळी जमिनीतील भेगात पाणी जाताच सरपटणारे प्राणी बाहेर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न होवो अथवा न होवो आम्हाला वाढीव मजुरी द्या अशा मजुरांच्या मानसिकतेमुळे रात्रीला ओलीतासाठी मजूर मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत स्वत: शेतमालकाला रात्रीच्या वेळी ओलीतासाठी शेतावर जाण्या शिवाय पर्याय उरला नाही.
मान्सून परतीचा पाऊस न आल्याने खरीपातील कापूस, तूर व रब्बीतील गहू व चणा या पिकांना ओलिताची खूप गरज आहे. पण चारही बाजूने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला विद्युत वितरण कंपनीने कोंडीत पकडण्याच्या मानसिकतेमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतात सरपटणाऱ्या प्राण्यांशिवाय जंगली श्वापदांचा हैदोसही होत असल्याने जीवितास धोका वाढला आहे. या कारणाने शेतात जागली करण्यासाठी शेतकऱ्यांना मचान बांधून त्यावर रात्र काढावी लागून ओलित करावे लागत आहे. वीजवितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्यवस्थित केल्यास त्यांना रात्रभर शेतात जागली करण्याची वेळ येणार नाही. परंतु वितरणच्या अशा धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आधीच उत्पादनाची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत भारनियमन कमी करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)

Web Title: Lightning loads in the field in the night ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.