हनुमान टेकडीवर वृक्ष सुरक्षेसह प्रकाश व्यवस्था होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:44 IST2017-12-27T23:44:08+5:302017-12-27T23:44:19+5:30
येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले.

हनुमान टेकडीवर वृक्ष सुरक्षेसह प्रकाश व्यवस्था होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच या टेकडीवर भेट देत झाडांची पाहणी करीत येथे रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. शिवाय झाडांच्या सुरक्षेकरिताही उपाययोजना आखण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांना दिले.
यावेळी त्यांनी टेकडीवर सुरू झालेल्या ग्रीन जिमची पाहणी केली. शिवाय त्यांनी येथे काही वेळ व्यायामही केला. टेकडीवर त्यांच्याच मार्गदर्शनात वृक्षारोपण झाले आहे. वैद्यकीय जनजागृती मंच हनुमान टेकडीवर वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, जलसंवर्धन आदी विविध प्रकल्प राबवित आहे. या विविध प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. येथे सुरू करण्यात आलेल्या जलसिंचन विभागाच्या वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रकल्पाची उपयोगिता व त्यांच्या कामाची पाहणीही त्यांनी केली. यावेळी ग्रा.पं. सरपंच अजय गौळकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवाल येथे आले असता त्यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी श्रमदानही केले. यावेळी टेकडीवर काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत व्हीजेएम सदस्य तसेच येथील नागरिकांनी त्यांना अवगत केले. यावर मार्ग काढण्याकरिता लवकरच टेकडीवर नागरिकांची, वृक्षांची सुरक्षा तसेच लाईट व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली.
यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सदस्य श्याम भेंडे, मंगेश दिवटे, प्रभाकर राऊत, महेश अडसुले, डॉ. बोबडे यासह नागरिकही उपस्थित होते.