संततधारेने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By Admin | Updated: August 14, 2015 02:24 IST2015-08-14T02:21:31+5:302015-08-14T02:24:03+5:30

गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे.

The life of the saints in Santhadere disrupted | संततधारेने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

संततधारेने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

वर्धा : गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. सेलू तालुक्यातील खैरी गावाचा दोन दिवसांपासून जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. सतत तीन दिवसांपासून पुलावरून पाणी वाहत आहे. मजरा रस्त्यावरूनही पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. सर्व नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने ठेंगणे व जुने पूल पाण्याखाली आले आहेत. अप्पर व निम्न वर्धा प्रकल्पांतून पाणी सोडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आकोली : धाम नदीच्या काठावर वसलेल्या खैरी गावाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुलावरून पाणी असल्याने मंगळवारपासून शाळा कुलूपबंद आहे. आरोग्य व मुलभूत गरजांची चणचण भासत आहे. गावातील कामे ठप्प झाली असून जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
सोमवार रात्रीपासून पुलावरून पाणी वाहत आहे. गुरूवारीही पूल पाण्याखालीच असल्याने रहदारी ठप्प आहे. सततच्या पावसामुळे नदीचा जलस्तर वाढीवर आहे. पुराने १५०० लोकसंख्येच्या गावाला वेठीस धरल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. खैरी येथे चार वर्ग असून दोन शिक्षक आहेत. दरवर्षीचा अनुभव असताना शिक्षक पावसाळ्यात मुख्यालयी राहणे टाळतात. यामुळे शाळा कुलूपबंद ठेवण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थ सांगतात. शाळा बंद असल्याची माहिती शिक्षकांनी शिक्षण विभागापासून दडवून ठेवल्याचेही समोर आले आहे. गावातील रुग्णांचे हाल होत आहे. अनेक घरांत रुग्ण आहे. सुंदरा बावणे (५५) या महिलेला हृदयविकाराचा झटका आला; पण दैव बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री थांबली. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली.(वार्ताहर)
पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता
आर्वी - काही क्षणाच्या विश्रांतीनंतर गुरूवारी सकाळपासून तालुक्यात संततधार सुरू झाला. या सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पुराच्या पावसाने बाकळी, आडनदी, वर्धा व इतर नदी-नाल्यांना मोठा पूर आला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातच गुरूवारी सकाळपासून तालुक्यात संततधार पावसाची सुरूवात झाल्याने याही आठवड्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संततधार पावसाने फुलावर आलेल्या सोयाबीन पिकावर विपरित परिणाम होत आहे. कपाशी आणि तूर पिकालाही सततच्या पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. तालुक्यातील शेत शिवारात जागोजागी पावसामुळे डबके साचले आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बाकळी, आड, वर्धा, आर्वीतील लेंडी नाला व गाव नाल्याच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ गेट उघडण्यात आले होते. मंगळवारी १५ तर बुधवारी पुन्हा ३१ दरवाजे उघडण्यात आले होते. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास निम्न वर्धा प्रकल्पाची सर्व दारे अधिक प्रमाणात उघडावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संततधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून डबके साचले आहे. संततधार पाऊस व अन्य समस्या यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The life of the saints in Santhadere disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.