वृद्धाची हत्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: June 21, 2014 02:00 IST2014-06-21T02:00:06+5:302014-06-21T02:00:06+5:30
वृद्धाची अमानुषरित्या मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती़ या प्रकरणातील आरोपी गणपत किशोर भांगे

वृद्धाची हत्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेप
वर्धा : वृद्धाची अमानुषरित्या मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती़ या प्रकरणातील आरोपी गणपत किशोर भांगे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकनवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ हा निर्वाळा गुरूवारी दुपारी देण्यात आला़
कारंजा (घा.) येथे माणिक चाफले यांचे घर आहे. २०११ मध्ये माणिक चाफले यांचा मुलगा महादेव हा पंढरपूर येथे गेला होता. त्यावेळी आरोपी गणपतने महिलेस कामावर का येत नाही, अशी विचारणा केली़ यावरून वाद उत्पन्न झाला होता. यानंतर महादेव चाफले यांनी गणपत यास मारहाण केली होती. १ आॅगस्ट २०१२ रोजी गणपत भांगे याने महादेव चाफले यांच्या घरासमोर येत शिवीगाळ केली़ यामुळे महादेवची पत्नी संगीता ही त्याला बोलविण्यास गेली. दोघेही पती-पत्नी घरी येत असताना गणपतने वाटेतच जवळ असलेल्या काठीने संगीताला मारहाण केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्याकरिता दोघेही कारंजा येथे गेले. माणिक चाफले व महादेवची मुलगी वनीता (११) घरी होते. गणपतने पुन्हा चाफले यांच्या घरासमोर येत शिवीगाळ केली़ काही वेळाने गणपतने टीकाशीच्या दांड्याने माणिक यांना जबर मारहाण केली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ ही संपूर्ण घटना ११ वर्षीय वनीताने पाहिली.
या प्रकरणी महादेव चाफले यांनी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपी गणपत यास अटक करण्यात आली. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन साळुंके यांनी केला़ तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले़ सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकनवाडी यांच्यासमोर न्यायदानाकरिता आले असता शासकीय अभियोक्ता विनोद देवघरे यांनी ५ साक्षदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी वनीताचीही साक्ष नोंदविण्यात आली़
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या़ कंकनवाडी यांनी आरोपी गणपत भांगे यास भादंविच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची तर कलम ३२४ अंतर्गत तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत़ कारंजा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार प्रमोद डोणे यांनी शासकीय वकिलांना प्रकरण चालविण्याकरिता सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)