अस्वच्छतेमुळे हॉटेल ‘गणराज’चा परवाना निलंबित
By Admin | Updated: February 18, 2017 01:28 IST2017-02-18T01:28:59+5:302017-02-18T01:28:59+5:30
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या स्वच्छतेचे नियम पालन करण्यात हयगय केल्याने मुख्य मार्गावरील हॉटेल गणराजचा परवाना १० दिवसांकरिता

अस्वच्छतेमुळे हॉटेल ‘गणराज’चा परवाना निलंबित
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई
वर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या स्वच्छतेचे नियम पालन करण्यात हयगय केल्याने मुख्य मार्गावरील हॉटेल गणराजचा परवाना १० दिवसांकरिता निलंबित करण्यात आला आहे. तसे आदेश हॉटेल मालकाला देण्यात आले असून १६ ते २५ फेब्रुवारी २०१७ या काळात सदर हॉटेल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रविराज धाबर्डे यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी हॉटेल गणराज, येथे तपासणी केली. यात हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमन २०११ च्या अनेक तरतुदीचे उल्लंघन, तसेच सदर हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले होते.
त्यानुसार अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांंतर्गत सदर हॉटेलचे मालक अजय भुते यांना हॉटेलमध्ये सुधारणा करण्याकरिता नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना सुधारणा करण्याकरिता पुरेसा कालावधी देण्यात आला होता. मात्र पुन्हा केलेल्या तपासणीत या हॉटेल मालकाने कुठलीही सुधारणा केली नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर प्रकरणात आढळलेले दोष, कायद्यांतर्गत कलमांच्या उल्लघनाबाबत प्रकरण तपासी अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्त (अन्न) तसेच परवाना अधिकारी, अन्न व औषध प्रशासन जयंत वाणे यांच्याकडे सादर केले होते.
आणखी पाच हॉटेलवर येणार गंडांतर
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांंतर्गत आपल्या हॉटेलात स्वच्छता न बाळगता अनेक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलेल्या तब्बल पाच हॉटेलवर परवाना निलंबणाची कारवाई करण्यात येणार आहे. ती हॉटेल कोणती याची माहिती मात्र विभागाकडून देण्यात आली नाही. ही कारवाई येत्या दिवसात होईल, असे सांगण्यात आले आहे.