बालकांना प्रात्यक्षिकातून साहसाचे धडे
By Admin | Updated: April 25, 2016 01:54 IST2016-04-25T01:54:20+5:302016-04-25T01:54:20+5:30
स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व स्काऊटस आणि गाइडसचे नागपूर विभागीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने

बालकांना प्रात्यक्षिकातून साहसाचे धडे
साहसी प्रशिक्षण शिबिर : विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शारीरिक कवायती व साहसी खेळांची दिली माहिती
वर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व स्काऊटस आणि गाइडसचे नागपूर विभागीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय साहसी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी निवड केलेल्या ४८ मुलामुलींना साहसी खेळाचे धडे देण्यात आले.
शिबिरादरम्यान भारत स्काऊटस आणि गाईडसचे मुख्य राष्टीय आयुक्त भा. ई. नगराळे यांनी शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. याशिवाय शिक्षक आमदार गाणार, रामटेकचे आमदार मलिक्कार्जून रेड्डी, राज्य स्काऊट आयुक्त वसंत काळे, मुख्यालय आयुक्त आर.आर. जयस्वाल, राज्य गाईड आयुक्त मंगला करंदीकर, सहसचिव सारीका बांगडकर, विभागीय आयुक्त शकुंतला चौधरी यांच्यासह स्काऊटस-गाईडसच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना भा.ई. नगराळे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसूचक व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे. याकरिता बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केवळ सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारवलेली पिढीच बदल करु शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिबिर प्रमुख म्हणून स्काऊटचे सहायक जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर होते. यासह रोव्हर लिडर संतोष तुरक, रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या शिबिरातून बालकांना २१ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षण देण्यात आले. यासह रॉक क्लाईबिंग, ट्रेझर हंट व विविध प्रकारचे साहसी प्रशिक्षण देण्यात आले. टे्रेकिंगकरिता रामटेक परिसरातील नागार्जून टेकडी, अंबाळा टेकडी, रामगिरी टेकडी व खिंडसी या परिसरात पदभ्रमंती करण्यात आली. शेकोटी कार्यक्रमातून पर्यावरण जागृती, विविध सामाजिक समस्या व राष्ट्रप्रेमावर आधारित विविध पथनाट्य शिबिरार्थ्यांनी सादर केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी स्काऊटचे राज्य मुख्यालय आयुक्त आर. आर. जयस्वाल उपस्थित होते. यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले, कृतिशील नागरिक बनविण्यासाठी शिक्षणासोबत खेळ व साहस प्रकल्पाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून या प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. यासह ‘जंगल वाचवा’, पाणी वाचवा, ‘वन्य प्राण्याचे संरक्षण करा’ या विषयांवर चित्रकला व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. यात सहभागी शिबिराथींना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. रवींद्र गुजरकर यांनी तर आभार संतोष तुरक यांनी मानले. यावेळी ‘शहिदो की चिताओ पर खडी हुई स्वतंत्रता’ हे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. शिबिराकरिता आशिष कांबळे, आश्विनी घोडखांदे, मनोहर जामकर, बागडे व आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
स्काऊट-गाईड पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार
आंजी (मोठी)- येथील आदर्श विद्यालयाच्या प्रियंका प्रवीण बाकडे, वैष्णवी हरिभाऊ राऊत या विद्यार्थिनींना राज्यस्तरीय स्काऊट-गाईड पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा निरीक्षक हांडे, मुठाळ उपस्थित होते. विद्यार्थिनींना बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रभारी मुख्याध्यापक सुहासिनी शेंडे, स्काऊट गाइडच्या प्रमुख पुष्पा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.