नंदीखेडा परिसराचे विद्रूपीकरण

By Admin | Updated: August 1, 2016 00:32 IST2016-08-01T00:32:06+5:302016-08-01T00:32:06+5:30

नजीकच्या पवनार येथील नंदीखेडा परिसर हा दशक्रियेसाठी आलेल्या नागरिकांमुळे नेहमीच गजबजलेला असतो.

Leprosy of Nandikheda area | नंदीखेडा परिसराचे विद्रूपीकरण

नंदीखेडा परिसराचे विद्रूपीकरण

मुख्य मार्गावर सर्वत्र चिखल : अस्ताव्यस्त उभी राहतात वाहने
वर्धा : नजीकच्या पवनार येथील नंदीखेडा परिसर हा दशक्रियेसाठी आलेल्या नागरिकांमुळे नेहमीच गजबजलेला असतो. या भागात सौंदर्यीकरणाचेही बरेच काम झाले आहे. पण सर्वत्र पसरलेली अव्यवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि प्रत्येकाचा मनमानी कारभार यामुळे नंदीखेडा प्रवेशद्वारावरच सर्वत्र चिखल साचला आहे. यामुळे परिसराचे विद्रूपिकरण झाले आहे.
नंदीखेडा परिसराला पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळाला आहे. धाम नदीच्या काठावर हा परिसर असल्याने पूर्वीपासूनच येथे दररोज शेकडो नागरिक दशक्रिया विधी व इतरही कारणांसाठी येतात. त्यांच्या सुविधेसाठी आणि विनोबा आश्रम परिसरात दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी नंदीखेडा भागात काही वर्षांपूर्वी घाट बांधण्यात आले. संपूर्ण परिसराचे पक्के बांधकाम करण्यात आले. नागरिकांची वर्दळ बघता येथे अनेक सोयीसुविधाही निर्माण करण्यात आल्या. नागरिकांची गर्दी होत असल्याने येथे स्थानिकांनी दुकाने थाटली असून अनेकांना यातून रोजगारही निर्माण झाला आहे. येथे मंदिरांची बहुलता असल्याने दर्शनार्थींची वर्दळ असते. पण येथे प्रवेश करताना नागरिकांना चिखल तुडवावा लागत आहे. आजुबाजुला दुकानांची गर्दी झाली आहे. तसेच मंदिरांसमोरच्या मोकळ्या जागेत नागरिकांची वाहने अस्ताव्यस्त स्थितीत ठेवलेली असतात. ग्रामपंचायतचे लक्ष नसल्याने या भागातील सौंदर्यीकरणाचेच आता विद्रूपिकरण होत आहे. येथील विक्रेत्यांनीही स्वच्छतेची जाणीवे ठेवणे गरजेचे झाले आहे.
रात्रीला या भागात मद्यपींचा हैदोस असतो. सकाळी फेरफटका मारायला गेल्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पाहून ही बाब निदर्शनास येते. याचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. मद्यपींमुळे नंदीखेडा परिसराचे धार्मिक व सामाजिक पावित्र्यही धोक्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Leprosy of Nandikheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.