उधारीमुळे शेतकऱ्यांवर बाजारपेठेत तोंड लपविण्याची वेळ
By Admin | Updated: January 31, 2015 01:55 IST2015-01-31T01:55:01+5:302015-01-31T01:55:01+5:30
कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला.

उधारीमुळे शेतकऱ्यांवर बाजारपेठेत तोंड लपविण्याची वेळ
सेलू : कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले़ बाजारातील शेतकऱ्यांची पत धोक्यात आली. कृषी केंद्र, किराणा, कापड व इतर वस्तू वर्षभर उधारीवर घेण्याची सवय असलेला शेतकरी आता त्याचे खाते चुकता करू शकत नाही. यामुळे बाजारात येऊन नाईलाजाने तोंड लपविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़
सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. घरात खाणारे तोंड वाढत आहे. घर खर्चही वाढतच आहे. महागाई शिखरावर पोहोचत आहे; पण शेतकऱ्यांना सतत नापिकी व भावबाजीचा फटका सहन करावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचा उतारा नाममात्र असून यंदा भावही पडले आहेत़ बाजारातील उधारी वाढली आहे. दुकानदार उधारी वसुलीचा तगादा लावत आहेत़ बाजारपेठेत आल्यानंतर शेतकरी खिसा रिकामा असल्याने उधारी फेडू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यावर दुकानदाराजवळून जाताना तोंड लपवून जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक गावांतील सधन शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत़ इच्छा असतानाही उधारी फेडता येत नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना सलत आहे़ बाजारात त्याची असलेली पत जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यामुळे शेतकरी वैफलग्रस्त होण्याचे प्रयाण वाढत असल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)