शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती
By Admin | Updated: August 14, 2015 02:22 IST2015-08-14T02:22:07+5:302015-08-14T02:22:07+5:30
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कार्यालयाची दुरवस्था दूर करणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती
कवेलू पडले टेबलवरच : दरवर्षी पावसाळ्यात कामांचा होतो खोळंबा
सेलू : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कार्यालयाची दुरवस्था दूर करणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे सेलू पंचायत समिती परिसरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागली. एवढेच नव्हे तर कवेलू व छताचा काही भाग तुटून पडला. यामुळे तेथील कामाचा काही वेळ खोळंबा झाला.
सेलू पंचायत समिती कार्यालयाला मागील पावसाळ्यात गळतीचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून या मुख्य इमारतीवर पाऊस लागण्यापूर्वीच ताडपत्र्या टाकून पाणी गळती थांबविण्यात येत होती. शिक्षण, पशुवैद्यकीय विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीची दुरवस्था झाल्याचे वृत्त यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले; पण वृत्ताची दखल घेण्याचे सौजन्य संबंधित विभागाने दाखविले नाही. यामुळे मागील पावसाळ्यात पशुवैद्यकीय कार्यालयाला गळतीला सामोरे जावे लागले होते. सदर इमारत ४० वर्षे जुनी असून बुधवारी आलेल्या पावसामुळे जीर्ण झालेले लाकूड तुटून छताचा काही भाग व कवेलू दैनंदिन कामकाज चालणाऱ्या टेबलवरच कोसळले. विस्तार अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या खोलीतच हा प्रकार घडला. अधिकारी समोरच असलेल्या सधन समूह केंद्राच्या इमारतीत कामकाजासाठी गेल्याने कुणालाही इजा झाली नाही. शासकीय कार्यालयाची दुरवस्था झाली असताना इमारतीचे साधे कवेलूही ४० वर्षांपासून बदलण्यात आले नसल्याचे समजते. ११० शाळांचा कारभार पाहणाऱ्या कार्यालयाची ही अवस्था नागरिकांना बुचकळ्यात टाकत आहे.(शहर प्रतिनिधी)