जिल्हा क्रीडा संकुलाला गळती
By Admin | Updated: June 16, 2015 02:19 IST2015-06-16T02:19:44+5:302015-06-16T02:19:44+5:30
पावसाळ्याला प्रारंभ होताच जिल्ह्यात नव्याने झालेल्या व काही जुन्या बांधकामांचे पितळ उघडे पडणे सुरू झाले आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाला गळती
पावसाच्या पाण्याने इमारतीत साचते डबके : माहिती देऊनही बांधकाम विभागाकडून सतत दुर्लक्ष
वर्धा : पावसाळ्याला प्रारंभ होताच जिल्ह्यात नव्याने झालेल्या व काही जुन्या बांधकामांचे पितळ उघडे पडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंना विविध खेळांच्या सरावाकरिता व क्रीडा धोरण विकासाकरिता असलेल्या क्रीडा संकूलाला पहिल्याच पावसात गळती लागली. यामुळे शासकीय इमारतींच्या कामात शासकीय विभागाकडून राखल्या जात असलेल्या कामाचा दर्जा उजेडात येत आहे.
रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या छतातून गळलेल्या पावसाच्या पाण्याचे डबके प्रत्येक विभागात सोमवारी दिसून आले. शहरात अद्याप धुवादार पाऊस आला नाही. धुव्वादार पाऊस आल्यास या इमारतीचे काय होईल याची कल्पना करणेही कठीण आहे. इतारतीचे छत गळल्याने साचलेले पाणी काढण्याकरिता महिलांना मजुरी देण्याची वेळ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर आली आहे.
जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे बांधकाम झाले त्या काळापासूनच इमारत गळत असून त्याची कल्पना बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. असे असताना होत असलेली गळती रोखण्याकरिता कुणाकडून कोणतीही उपाययोजना आखण्यात येत नाही. परिणामी इतारतीच्या छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे येथील क्रीडा साहित्य व तयार करण्यात आलेली सुविधा निरुपयोगी होण्याची वेळ आली आहे.
गत वर्षी येथील बहुउद्देशीय सभागृह व व्यायाम शाळेच्या छताची दुरवस्था झाल्याने २८ लाख रुपये खर्च करून त्याची दुरूस्ती करण्यात आली. असे असताना यंदाच्या पहिल्या पावसातच छतातून पाण्याच्या धारा लागल्या आहेत. २८ लक्ष रुपये खर्च करून करण्यात आलेली दुरूस्ती एकाच पावसात उघडी पडली आहे.
या व्यतिरिक्त सन २००७-०८ मध्ये एक कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅटमिंटन हॉलचीही अवस्था अशीच आहे. येथेही पाणी गळत असून खेळण्याकरिता तयार करण्यात आलेले विशेष मैदान धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या बॅटमिंटन हॉलमध्ये सायंकाळी खुद जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक बॅटमिंटन खेळण्याकरिता येत असल्याची माहिती आहे. त्यांचेही याकडे दुर्लक्ष तर होत नाही नाही ना, असा प्रश्न समोर येत आहे.
या व्यतिरिक्त येथे असलेले शुटींग रेंज, बिलियड हॉल व प्रशासकीय कार्यालयाच्या छताची अवस्था काही निराळी नाही. येथेही पाणी गळत असून कार्यालयातील कागदपत्र ओले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची माहिती या शासकीय इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या सर्वजनिक बांधकाम विभागाला नाही, असेही नाही. त्यांना या अवस्थेची कल्पना वारंवार देण्यात आली आहे; मात्र त्यांच्याकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत जिल्ह्याच्या क्रीडा विकासाकरिता आवश्यक असलेल्या या क्रीडा संकुलाची दुरूस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)
४आठ वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुलात बॅटमिंटन हॉल उभारण्यात आला. या हॉलमध्ये जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी खेळण्याकरिता येतात. असे असतानाही या हॉलच्या बांधकामात हयगय करण्यात आली.
४या व्यतिरिक्त येथे असलेले शुटींग रेंज, बिलियड हॉल व प्रशासकीय कार्यालयाच्या छताची अवस्था काही निराळी नाही. येथेही पाणी गळत असून कार्यालयातील कागदपत्र ओले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
४छताच्या कामात घोळ झाल्याने येथे पावसाच्या पाण्याचे डबके तयार झाले आहे.
रोजंदारीच्या महिला बोलावून काढले पाणी
४येथील विविध भागात साचलेले पाण्याचे डबके साफ करण्याकरिता रोजंदारीच्या महिलांना बोलावून काम करावे लागत आहे. याचा अतिरिक्त भुुर्दंड कार्यालयावर येत आहे. कधी स्वत: पैसे मोजावे लागतात.
या इमातीच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी बांधकाम विभाकडे आहे. इमारतीचे छत गळत असल्याबाबत तक्रारी असतील तर त्याची मला माहिती नाही. मात्र एसडीआर, एसएलआर अंतर्गत ती कामे करता येतील. शिवाय क्रीडा विभागाकडे येत असलेल्या अनुदानातून ते सुद्धा दुरूस्तीची कामे करू शकतात. त्यांना बांधकाम विभागाकडून ते करून घ्यायचे असेल तर तेही शक्य आहे.
- राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वर्धा
हा प्रकार आजचा नाही तर गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाला की पाणी गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याची माहिती बांधकाम विभागाला दिली नाही असे नाही. प्रत्येक वर्षी त्यांना याची माहिती पत्राद्वारे देण्यात येते. मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही होत नाही. यंदाही तसे पत्र दिले आहे.
- सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा