नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली
By Admin | Updated: February 26, 2017 00:57 IST2017-02-26T00:57:35+5:302017-02-26T00:57:35+5:30
मातृ संघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली आहे,

नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली
हर्षवर्धन ढोके : पत्रकार परिषदेतील वक्तव्य, ‘दि रिपब्लीकन’ विषयावर चर्चासत्र
हिंगणघाट : मातृ संघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली आहे, असा आरोप हर्षवर्धन ढोके यांनी केला. ‘दि रिपब्लीकन’ या विषयावरील चर्चासत्र व व्याख्यानानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवीन इंदुरकर, सुनंदा इंदुरकर, ज्योती हिरपुडे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, रिपब्लीकन राष्ट्राचे निर्माते, आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मातृ संघटन दिले. राजकीय उत्कर्षासाठी दि रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, धम्मचरणासाठी प्रचार व प्रसाराकरिता दि बुद्धीस्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि सामाजिक स्थैर्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली; पण या मातृसंघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील काही लोकांनी बाबासाहेबांची संकल्पनाच धुळीस मिळविली आहे. सत्ता, पद आणि प्रतिष्ठेच्या लालसेने अनेकांनी दुकानदाऱ्या सुरू केल्या आहेत. पर्यायाने बाबासाहेबांना अभिपे्रत असलेला प्रबुद्ध भारत निर्माण होऊ शकलेला नाही, हे भिषण वास्तव आहे.
बहुजन, मूलनिवासी सारख्या विकृत कल्पना राबवून समाजातील घटकांना एकमेकांपासून दूर करणाऱ्यांचे खरे स्वरूप ओळखणे गरजेचे आहे. कारण, बाबासाहेबांनी बहुजन मुलनिवासी सारख्या वेगळी व दिशाहीन संकल्पना कधीही स्विकृत केली नाही वा सांगितल्याही नाही. एका पक्षाचे असंख्य गट, विविध फुटीरवादी शाखा, विविध तुकडे, रक्ताचे नाते सांगून भ्रमीत करणारे वंशज, असे एका ना अनेक पक्ष आणि संघटना आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी निर्वाणीची वेळ आली आहे. गट-तट, मायावी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना बहिष्कृत करून बाबासाहेबांनी विश्वासाने दिलेले मातृसंघटन मजबुत करणे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे. त्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लीकनचे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शेवटी ढोके यांनी केले. यावेळी दि रिपब्लीकन या विषयावरही चर्चा करण्यात आली. पत्रपरिषदेला आयोजकांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)