मतदार स्वस्थ तर नेते अस्वस्थ

By Admin | Updated: September 9, 2014 23:55 IST2014-09-09T23:55:00+5:302014-09-09T23:55:00+5:30

स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत काही अपवाद वगळता पुलगाव-देवळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या मतदार संघात मागील कित्येक वर्षांत

Leaders are uncomfortable if voters are healthy | मतदार स्वस्थ तर नेते अस्वस्थ

मतदार स्वस्थ तर नेते अस्वस्थ

प्रभाकर शहाकार - पुलगाव
स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत काही अपवाद वगळता पुलगाव-देवळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या मतदार संघात मागील कित्येक वर्षांत काँग्रेसकडून देण्यात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी डोक्यावर घेतले; पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमुळे काँग्रेसचे पानिपत झाले. या लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारले. यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले असले तरी मतदार मात्र स्वस्थ असून आगामी निवडणुकीची प्रतिक्षा करीत असल्याचेच दिसते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेसपेक्षा ३ हजार ७४६ मतांनी मागे होती; पण एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघातून भाजपाला ८१ हजार ८२२ मते मिळाली, तेथे काँगे्रसला ५१ हजार २९६ मतेच मिळालीत. या निवडणुकीत काँगे्रसच्या मतांमध्ये ३० हजार ५२६ मतांचा खड्डा पडला. विद्यमान परिस्थिती पाहता या मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या हातून निसटल्या आहेत. रोहणी गावालगतच्या भिडी, विजयगोपाल व इंझाळा यासारखी मोठी गावे हातातून सुटल्यामुळे भाजपाची सत्ता स्थापित झाली.
मतदार संघातील देवळी व पुलगाव नगर परिषदेपैकी देवळी नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे तर अपक्षांच्या सहकार्याने पुलगाव नगर परिषदेवर सत्ता राखण्यात काँगे्रसला यश आले आहे. असे असले तरी नगरसेवकांची कुरघोडी सुरूच आहे. यातच काँगे्रसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे भाजपावासी झाल्याने त्यांचे कित्येक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाल्याने काँगे्रसला मोठा धक्का बसण्याची शक्यता मतदार संघात वर्तविली जात आहे. अद्याप विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असले तरी काँग्रेस व भाजपा या दोन्ही प्रबळ राजकीय पक्षांनी आपली मक्तेदारी सांगून या मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचेही दिसून येते. तालुक्यात रस्ते, नाल्या, समाज मंदिरे, खर्डा बॅरेज, पुलगाव बॅरेज, ग्रामपंचायत भवन, दवाखाने, लोअर वर्धा प्रकल्प या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू करून एकप्रकारे निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे चित्र आहे.
देवळी-पुलगाव मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४२ हजार ९१७ मतदार आहेत. २००९ च्या तुलनेत १७ हजार ८७७ नवीन मतदारांची यात भर पडलेली आहे. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ५८ हजार ५७५ मते तर भाजपाला ५० हजार ८२९ मते मिळाली होती. यातच पुलगाव, देवळी, नाचगणाव, गुंजखेडा या मोठ्या गावांमध्ये काँग्रेसची जवळपास ८ हजार मतांनी पिछेहाट झाल्याचे दिसून येते. मतदार संघाचा आढावा पाहता या मतदार संघात बेरोजगारी, शेतकरी, शेतमजुरीचे प्रश्न, औद्योगिक वसाहत आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे रस्ते, नाल्या, पूल या बांधकामांमुळे ग्रामीण भागाचे प्रश्न सुटत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात असल्याचेही दिसून येते.

Web Title: Leaders are uncomfortable if voters are healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.