आष्टीतील चार शासकीय इमारतींना अखेर मंजुरी
By Admin | Updated: August 13, 2015 02:53 IST2015-08-13T02:53:36+5:302015-08-13T02:53:36+5:30
राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत तालुकास्थळी शासकीय इमारती बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

आष्टीतील चार शासकीय इमारतींना अखेर मंजुरी
आष्टी (श.) : राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत तालुकास्थळी शासकीय इमारती बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यासाठी चार इमारती मंजूर झाल्याची माहिती आमदार अमर काळे यांनी दिली. यासाठी निधीला मान्यता मिळाली असून जागा निश्चितीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
समाज कल्याणतर्फे मुलींच्या वसतिगृह इमारतीसाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले. यासाठी अण्णाभाऊ साठे पुतळ्यामागील जागा निश्चित झाली आहे. लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. पंचायत समितीच्या इमारतीसाठी १ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले. त्याची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आ. काळे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालय बांधकाम पूर्ण झाले असून विस्तारणाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविणार आहे. यात वाढीव निधी आणून उर्वरित बांधकाम होणार आहे. डॉक्टर निवासस्थानासाठी दीड कोटी रुपये मंजूर असून बस स्थानकाच्या मागील जागेचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविला जाणार आहे.
तहसीलदारांकडे जागेची फाईल प्रतीक्षेत आहे. न्यायालयाची इमारत मंजूर असून त्याचाही निधी प्राप्त होणार आहे. यासाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे. चार इमारतींचे बांधकाम होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)